प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडे मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी.
मुंबई,शिवसेना आमदार संजय गायकवाड व भाजपाचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना शारिरिक इजा पोहचवावी, गंभीर दुखापत करावी, अशा पद्धतीची गुन्हेगारी स्वरुपाची विधाने केलेली आहेत. अशा पद्धतीची विधाने करुन राहुल गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या खासदार डॉ. अनिल बोंडे व आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींना धमकी दिल्याप्रकरणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, विक्रम ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षनेते पद हे संवैधानिक पद आहे, त्या पदाची प्रतिष्ठा आहे, त्याचा मान राखला पाहिजे. राहुल गांधी यांची ‘जीभ कापून आणणाऱ्यास 11लाख रुपयांचे बक्षिस देऊ’, ‘राहुल गांधी यांच्या जीभेला चटके द्या’ अशी प्रक्षोभक व जीवाला धोका पोहचवणारी विधाने करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे या लोकप्रतिनिधींनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेली भाषा गुन्हेगारी प्रवृत्तीला चिथावणी देणारी आहे, अशा भडाकाऊ विधानाने राहुल गांधी यांच्या जीवाला गंभीर धोका होऊ शकतो. गांधी कुटुंबातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. गांधी कुटुंबाच्या जीवाला नेहमीच धोका आहे. हे सर्व लक्षात घेता राहुल गांधींना धमकी देणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.