
एस. टी. कर्मचारी अडचणीत असताना स्वयंघोषीत नेते ऍड. गुणरत्न सदावर्ते गप्प कसे ?
मुंबई,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी यांचे पगार रखडले आहेत. दिवाळी तोंडावर आली तरी पगार झालेला नसल्याने दिवाळी सण कसा साजरा करायचा या चिंतेत एसटी कर्मचारी आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ पगार व बोनस देऊन एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी मातंग समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या व राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी मागील वर्षी संप करण्यात आला होता. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आंदोलकांशी चर्चा करून मागण्या मान्य केल्या होत्या. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला नियमितपणे करण्याचे मान्य करून तशी व्यवस्थाही मविआ सरकारने केली होती. मागण्या मान्य झाल्यानंतरही एस. टी. कर्मचाऱ्यांची कार्टात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्वयंघोषीत नेता बनून हा संप मागे घेऊ दिला नाही. एस टी कर्मचाऱ्यांना चुकीची माहिती देऊन संप सुरुच ठेवला. राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाचा मुद्दा कार्टात असतानाही कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम या वकीलाने केले होते.
त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरण हाच एकमेव पर्याय सांगितला होता. आता भाजपाचे सरकार राज्यात आलेले आहे. एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण कधी करणार हे आ. पडळकर व सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट करावे व त्यासाठी त्यांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसटी विलिनीकरणाचा प्रश्न घेऊन विलिनीकरण करून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून केवळ आपले नेतृत्व चमकवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर केला याबद्दल जाहीर माफी मागावी.
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिन्याला ३६० कोटी रुपये लागतात पण शिंदे-फडणवीस सरकार ही रक्कमही वेळेवर देत नाही. महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी केलेली तरतूद शिंदे फडणवीस सरकारने बदलल्याने पगाराची समस्या निर्माण झाली आहे. संपकाळात मोठ- मोठी आश्वासने देणारे ऍड. सदावर्ते व त्यांचे बोलविते धनी आता मात्र गप्प बसले असून एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या कर्मचाऱ्यांचा पगार तात्काळ करावा, असे राजहंस म्हणाले.