कट्टरता दूर केल्याशिवाय धार्मिक सलोखा शक्य नाही..

Share

फोटो :चंद्रकांत झटाले बोलताना.

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : कट्टरता दूर झाल्याशिवाय धार्मिक सलोखा शक्य नाही, असे प्रतिपादन करतानाच, सर्व धर्मातील कट्टरता दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ’मजबुती का नाम महात्मा गांधी’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत झटाले यांनी येथे केले. 

      मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) या संघटनेच्या वतीने ताडदेव येथील जनता केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक सलोखा परिषदेत श्री. झटाले बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. 

 धार्मिक कट्टरता दूर केल्याशिवाय सलोखा होणे शक्य नाही. धार्मिक द्वेष रोखणे ही आपली जबाबदारी आहे. हिंदू धर्म धोक्यात आहे म्हणजे नेमके काय, असा सवाल करीत मुघलांनी ७०० वर्ष राज्य केले, ब्रिटिश दिडशे दोनशे वर्षे होते, त्यावेळी धर्म धोक्यात आला नाही. मग सगळ्या महत्वाच्या पदांवर हिंदूच असताना आज धर्म धोक्यात कसा येऊ शकतो, असा सवाल करून, हा समाजाचे मन भटकवणारा प्रचार आहे, असे श्री. झटाले म्हणाले.     

  धर्म आधारीत देश झाल्याने देशासमोरील प्रश्न सुटणार नाहीत. उलट धर्माधारित देशांची काय स्थिती आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. महापुरुषांच्या अनुयायांनी एकत्र आले पाहिजे. तरच कट्टरता विरोधी लढा आपण जिंकू शकू, असे शेवटी ते म्हणाले.

जयंत दिवाण यांनी हुतात्मा वसंत व रजब यांच्या बद्दल माहिती दिली. वसंत हेगीष्टे व रजब अली लाखाणी हे दोन मित्र १९४६ साली अहमदाबाद शहरात उसळलेली दंगल थांबविण्याच्या प्रयत्नात शहीद झाले होते. स्वातंत्र्य लढ्यातील हा वारसा आपण जपला पाहिजे, असे जयंत दिवाण म्हणाले.

बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांनी यांनी देशाच्या आर्थिक प्रगती साठी धार्मिक सलोखा व शांतता आवश्यक आहे, अशी मांडणी केली. पत्रकार व जनता दल पक्षाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी इतिहासातील उदाहरणे देऊन धार्मिक सलोख्याचे महत्व पटवून दिले. 

परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलतांना हर्षवर्धन सपकाळ यांनी शाहू- फुले-आंबेडकर यांचा विचार,  वारकरी संप्रदाय यांची उदाहरणे देत बहुजन समाजातील संत परंपरेचा आढावा घेतला. खरा हिंदू धर्म संत परंपरेचा धर्म आहे. हे आपण ठणकावून सांगितले पाहिजे, असे ते म्हणाले. 

परिषदेची प्रस्तावना व सूत्रसंचालन मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष दिनेश राणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष चित्रा राणे यांनी केले.

परिषद यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गिरीश कटारिया, सचिव संग्राम पेटकर, खजिनदार डॉ यु. व्ही. महाडकर, निरंजनी शेट्टी व कार्यकारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले


Share

One thought on “कट्टरता दूर केल्याशिवाय धार्मिक सलोखा शक्य नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *