
एसएमएस -प्रतिनिधी :मिलन शहा
संस्कृतीच्या पायघड्या, कलांना पंख : संस्कृती आर्ट फेस्टिवल २०२५ ची मंत्री सरनाईक यांनी केली घोषणा!
मीरा,भाईंदर : मीरा–भाईंदरच्या विकासगाथेला नवीन तेज, कला-संवर्धनाला नवी ऊर्जा आणि शहराच्या प्रत्येक हृदयाला नवा स्पंदन देण्यासाठी प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे साकारला जाणारा ‘संस्कृती आर्ट फेस्टिव्हल २०२५’ यंदा दिनांक १२,१३,१४, आणि १५ डिसेंबर २०२५ रोजी भव्यदिव्य रुपात अवतरत आहे. या महोत्सवाची अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी करताच संपूर्ण शहरात उत्साहाचे नवे प्रवाह उसळाले आहेत.
या वर्षीचा आर्ट फेस्टिव्हल मीरा–भाईंदरच्या प्रगतीच्या प्रवासाला कलात्मक रूप देणाऱ्या अनोख्या विषयावर सजणार असून शहराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक निगडिततेचे प्रतीक म्हणून राममंदिर ध्वजाची पवित्र प्रतिकृती महोत्सवाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. तसेच परिसर आनंद, श्रद्धा आणि परंपरेने उजळून निघणार आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशनचा हा संपूर्ण कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी मोफत खुला असून, कला हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित होते.
१२ डिसेंबर रोजी विविध धर्म, विविध समाजाचा हातात हात घालून एकतेचा संदेश देणारी भव्य सांस्कृतिक रॅली महोत्सवाची सुरुवात करील. १२ ते १४ डिसेंबर या तीन दिवसांत मीरा–भाईंदरचे रस्ते, चौक, वायुमंडळ सगळेच कला, संस्कृती, ताल, रंगकारंजे आणि आनंदोत्सवाने न्हाऊन निघणार आहेत.
कलासृष्टीच्या प्रत्येक प्रवाहाला दाद देण्यासाठी विविध आकर्षक मंचांची निर्मिती:
१)मुद्रा स्टेज – भारतीय नृत्यभावनांचे विश्व.
२)विरासत स्टेज – परंपरेचे जतन, कला–संस्कृतीचे दर्शन.
३)बीट ट्रीट स्टेज – तरुणाईच्या तालावर धडकणारा उर्जावान ठेका.
४)आर्ट गॅलरी, रांगोळी आणि फोटोग्राफी प्रदर्शने – सृजनशीलतेचे रंगमहाल.
सुप्रसिद्ध गायकांच्या आणि कलावंताच्या उपस्थिती रंगणार आर्ट फेस्टिवल
दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही आर्ट फेस्टिवलची संध्याकाळ सुरमय आणि मनोरंजनात्मक करण्यासाठी अनेक नामवंत गायक आणि कलाकार उपस्थित राहून कार्यक्रम अधिक उत्स्फूर्त करणार आहेत. आर्ट फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १२ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक ‘शान’ यांच्या सुरेल स्वरांची स्वर्गीय मैफल शहराच्या नभात नाद उमटवेल.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच १३ डिसेंबरला सुप्रसिद्ध हास्यकवी आणि सुप्रसिद्ध हिंदी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील कलाकार तारक मेहता उर्फ ‘शैलेंद्र लोढा’ आपल्या शब्दकलेच्या तेजाने प्रेक्षकांना हास्यात हरवून टाकतील. फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच १४ डिसेंबरला सध्या महाराष्ट्रात नाही तर परदेशात ही गाजलेले, मराठी संस्कृतीला जीवन देणारा लोककला बँड “The Folk आख्यान” आपल्या साहित्यिक लोककलाकृतींची अनोख्या स्वरूपात विशेष प्रस्तुती मनाला भारावून टाकेल.
चौथ्या दिवशी म्हणजेच १५ डिसेंबर रोजी तरुणाईच्या मनात घर करणारा सुप्रसिद्ध पार्श्वगायक ‘स्टेबीन बेन’ आपल्या प्रेमगायनाने महोत्सवाची रंगत आणखी खुलवणार आहे.
या अविस्मरणीय महोत्सवाची घोषणा करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “मीरा–भाईंदरचा आत्मा म्हणजे येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची संस्कृती, परंपरा आणि त्यांच्या मनात दडलेली अप्रतिम कलाशक्ती. ‘संस्कृती आर्ट फेस्टिव्हल २०२५’ हा केवळ कार्यक्रम नाही, तर आपल्या शहराच्या स्वप्नांची, प्रगतीची आणि सर्जनशीलतेची भव्य प्रतिकृती आहे. या शहराच्या विकासा सोबतच शहरातील जनतेच्या मनांना समृद्ध करणं, कलांना व्यासपीठ देणं, आणि नागरिकांना आनंदाचे क्षण देणं ही देखील माझी जबाबदारी आहे. शहरातील प्रत्येक कलावंत, प्रत्येक तरुण, प्रत्येक कुटुंबाला आपलेपणाने सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न अखंड आहे. मला संपूर्ण विश्वास आहे की १२ ते १४ डिसेंबरदरम्यान मीरा–भाईंदरचा प्रत्येक कोपरा उत्सव, उर्जा आणि उत्कर्षाच्या प्रकाशाने उजळून निघेल. कला कधीही विकत घेण्याची गोष्ट नाही; ती अनुभवण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे, आणि हा अधिकार शहरातील प्रत्येक नागरिकाला आम्ही अभिमानाने देत आहोत. मी सर्व जाती–धर्मांच्या नागरिकांना आवाहन करतो. या कला,सूर,परंपरेच्या दिव्य महोत्सवात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा आणि आपल्या शहराच्या सांस्कृतिक सन्मानात आपलं योगदान नोंदवा. कारण मीरा–भाईंदर उभं आहे एका नव्या सांस्कृतिक पर्वाच्या उंबरठ्यावर, आणि त्या इतिहासाचा भाग होण्याची हीच योग्य वेळ आहे.”
Good
अगदी स्तुत्य उपक्रम… छान
Good initiative
Nice