
जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. अशाश्वतता हाच सृष्टीचा नियम आहे. परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला त्याची जबाबदारी निश्चित करुनच या भूतलावर पाठवत असतो. परमेश्वराने मालाडकर जनतेच्या सेवेची जबाबदारी माझ्यावर सोपवूनच या भूतलावर पाठवलं आहे, या भूमिकेतूनच आजवर राजकीय, सामाजिक जीवनात कार्यरत राहिलो, पुढेही राहिन.
अडीच वर्षांपूर्वी राज्याचा कॅबिनेट मंत्री झालो. वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे या खात्यांसोबतच मुंबई शहराच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देखील मला मिळाली. मालाडकर जनतेचे प्रेम आणि आशीर्वादाने आमदार बनलेल्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला एवढी मोठी जबाबदारी मिळणं ही माझ्यासाठीच नव्हे तर मालाडकर जनतेसाठी देखील खूप मोठी गोष्ट होती. कारण मालाड विधानसभा क्षेत्रापुरत्या मर्यादीत असलेल्या माझ्या कार्याला यामुळे अधिक व्यापक स्वरुप प्राप्त होणार होतं.
कोणतेही पद जेव्हा तुम्हाला अधिकार देतं त्याच वेळी ते पद तुम्हाला जबाबदाऱ्यांसोबत अपेक्षांच प्रचंड मोठं ओझं देखील देतअसतं. मत्स्यव्यवसायासारख्या आजवर दुर्लक्षीत राहिलेल्या खात्यामध्ये देखील काम करायला खूप मोठा वाव आहे, हे मंत्रीपदाच्या प्रारंभीच्या काळातच माझ्या लक्षात आलं. माझ्या अडिच वर्षांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक धोरणात्मक बदल करून मत्स्यव्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याचा मी प्रयत्न केला. माशांच्या कातडीपासून विविध वस्तू बनविण्याचा प्रयोग केला.
गेली ४० वर्ष मच्छीमारांसाठी सक्षम कायदा नसल्याने अनधिकृत मासेमारीला ऊत आला होता. समुद्रामध्ये मत्स्यदुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. माझ्या कार्यकाळात पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचा एैतिहासिक कायदा करता आल्याचा आनंद देखील मनामध्ये आहे.
वस्त्रोद्योग, बंदरे व मुंबई शहराचा पालकमंत्री म्हणून देखील अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला.
जे काही मंत्री म्हणून करु शकलो त्याचा आनंद आहेच, पण आज या जबाबदारीतून मुक्त होत असताना बरच काही करायचं राहुन गेल्याची सल देखील आहे.
मंत्री बनल्यानंतर आलेल्या कोरोनाच्या वैश्विक संकटातून आता कुठे हळू-हळू आपण सावरु लागलो होतो. राज्याला दिशा देण्याची हीच खरी वेळ होती. ओएनजीसीने थकवलेली मच्छीमारांच्या नुकसान भरपाईची रक्कम त्यांना मिळवून देणं, यंत्रमाग धारकांची वीजबिल सवलत वाढवणं, मासेमारी यांत्रिकी नौकांचा डिझेल परताव्याचा अनुशेष शुन्य करणं, मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रात रोजगारनिर्मितीचे विविध प्रयोग करणं अशी अनेक काम अंतिम टप्प्यात असताना मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं लागतय याचं शल्य मनामध्ये आहे.
असो..! या सर्व प्रवासात माझे खाजगी सचिव, विशेष कार्य अधिकारी, आयुक्त, सचिव, मंत्रालयीन कर्मचारी, शासकीय निवासस्थानावर काम करणारे कर्मचारी सर्वांचे मोलाचे सहकार्य मला लाभले. या सर्वांचे मी आभार मानतो.
कोणतही पद हे शरीरावर परिधान करत असलेल्या वस्त्रासारखं असतं. त्या वस्त्रालाच जेव्हा आपण आपली कातडी समजू लागतो, तेव्हा ते जाताना असह्य वेदना होतात. मला मिळालेल्या मंत्रीपदाकडे जनतेची सेवा करण्याचं एक माध्यम म्हणूनच मी नेहमी पाहिलं. त्यामुळे ते पद गेल्याचं दु:ख नक्कीच नाही. पण खूप काही करायचं राहुन गेल्याची सल मात्र नेहमी राहिल.