
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
विशेष : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीतून सकाळी साडेसात वाजता संविधान सत्याग्रह पदयात्रे साठी चालत निघाले.सामाजिक न्याय, सलोखा, संविधानाच्या मूल्यांचे रक्षण, महिला सुरक्षा, वाढती बरोजगारी,धर्मनिरपेक्ष, शांततापूर्ण आणि आनंदी समाज निर्माण करण्यासाठी त्याच बरोबर गेल्या शंभर वर्षात समाजात द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या आहेत त्या भिंती तोडण्यासाठी ही पदयात्रा आहे.
या पदयात्रेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते यात तरुण मुलामुलींची संख्या लक्षणीय होती. सिव्हिल सोसायटीच्या कार्यकर्त्यांबरोबर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, माजी मंत्री आरिफ नसीम खान, आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री राजेंद्र मुळक,शिवसेनेच्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आदी नेते सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी 25 किलोमीटरचा प्रवास करीत पदयात्रा संध्याकाळी सातच्या सुमारास बुटीबोरी येथे पोहचली. रात्री बुटीबोरी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मध्यप्रदेशचे माजी आमदार आणि शेतकरी नेते डॉ. सुनीलम यांचे भाषण झाले.काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी यावेळी भाषणे केली. या सभेत बोलताना तुषार गांधी म्हणाले की,निवडणुकीच्या राजकारणातून आपण भाजपाला हरवू शकू पण देशामध्ये माणसां माणसामध्ये द्वेष पसरविणाऱ्या RSS ला आपल्याला हरवायचे आहे.संविधान प्रेमी नागरिक आपल्याला घडवायचा आहे. लोक मला विचारतात की ही यात्रा राजकीय आहे का? याची सुरुवात दीक्षाभूमीवरून का? मी त्यांना सांगू इच्छितो की,ही सत्ता परिवर्तनाची यात्रा आहे. सत्ता परिवर्तनाचा मार्ग हा दीक्षाभूमीतूनच सेवाग्रामच्या दिशेने जातो. हाच गांधी आणि आंबेडकरांचा मार्ग आहे.
पहिल्याच दिवशीच्या या पदयात्रेत सिव्हिल सोसायटी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुमारे हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.दीक्षाभूमीवर अभिवादन करून निघालेल्या या यात्रेत सुरुवातीला संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची एक दिंडी भजन करीत पुढे नेतृत्व करीत होते.त्याच्यामागे राष्ट्रीय गीते गात जाणारा टेम्पो होता.त्याच्या मागे महाराष्ट्रातून आलेल्या विविध जन संघटनाचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते चालत होते.त्यांच्या मागे तुषार गांधी आणि हर्षवर्धन सकपाळ ,संपूर्ण दिवस या पदयात्रेत चालत होते.रस्ता रस्त्यावर अनेक नागरिक पदयात्रेचे स्वागत करीत होते त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत होते.

जय भारत जय संविधान