गोरेगाव–मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातील जुळ्या बोगद्यांचे काम वेगात.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची प्रत्यक्ष पाहणी; जून २०२६ पासून बोगदा खोदकामाला सुरुवात
मुंबई : गोरेगाव–मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाअंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या ५.३ किलोमीटर लांबीच्या तिहेरी मार्गिकेच्या जुळ्या बोगद्यांसाठी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे उत्खनन कार्य सध्या वेगाने सुरू आहे. या कामाची आज अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.
या प्रकल्पांतर्गत भूमिगत जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी दोन अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरण्यात येणार आहेत. त्यापैकी एका TBM चे सर्व घटक भाग कार्यस्थळी उपलब्ध झाले असून दुसऱ्या TBM चे उर्वरित भाग उद्या, बुधवार दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री कार्यस्थळी दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील खोदकाम पूर्ण करून दिनांक १० मार्च २०२६ पर्यंत TBM ‘शाफ्ट’मध्ये उतरविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर जून २०२६ पासून प्रत्यक्ष बोगदा खोदकामास सुरुवात होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
श्री. बांगर यांनी लॉन्चिंग शाफ्टच्या सुरू असलेल्या उत्खनन कार्याची पाहणी केली. हा शाफ्ट अंदाजे २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ३० मीटर खोल आहे. आतापर्यंत २३ मीटर खोलीपर्यंतचे उत्खनन पूर्ण झाले असून उर्वरित ७ मीटर खोदकाम तातडीने पूर्ण करून TBM कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ‘क्रॅडल’ (Cradle) तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सध्या दररोज सुमारे १४०० ते १५०० घनमीटर दगड व माती खोदकामातून बाहेर पडत असून त्याचे वहन दररोज सुमारे १२० वाहनांद्वारे करण्यात येत आहे. निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना श्री. बांगर यांनी दिल्या.
युद्धपातळीवर सुरू असलेल्या या कामाच्या माध्यमातून गोरेगाव–मुलुंड जोड मार्ग प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


Share

2 thoughts on “गोरेगाव–मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातील जुळ्या बोगद्यांचे काम वेगात.

  1. गेल्या कैक वर्षांपासून रेंघाळलेल्या कामाचा आज पावेतो निकाल लागला, जोड मार्ग प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे काम वेगाने सुरु झाले असले तरी मध्यम काळात हे काम कासव गतीने व्हायला नको म्हणजे झालं!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *