मुंबई: मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) तर्फे वसंत व रजब या दोन गांधीवादी मित्रांच्या हौतात्म्याच्या स्मृतीनिमित्त शनिवार दिनांक १९ जुलै रोजी धार्मिक सलोखा परिषद आयोजित करण्यात आली आहे.
जनता केंद्र, तुळशीवाडी पोस्ट ऑफिस जवळ, ताडदेव येथे दुपारी ४.३० वाजता ही परिषद होणार आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्यात १८ रचनात्मक कार्यक्रम दिले होते. त्यातील एक महत्वाचे कलम होते कौमी एकता! वसंत हेगिष्टे व रजब अली लाखाणी हे दोन गांधी विचारांचे मित्र हिंदू मुस्लिम दंगल थांबविण्याच्या प्रयत्नात १९४६ साली अहमदाबाद येथे मारले गेले होते. स्वातंत्र्य आंदोलनातील ही अद्वितीय वा अपवादात्मक घटना आहे. या घटनेच्या स्मृती जपल्या जाव्यात, तसेच स्वातंत्र्य आंदोलनातील हा वारसा तरुणांपर्यंत पोहचविण्यासाठी मूलभूत अधिकार संघर्ष समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
लेखक व पत्रका चंद्रकांत झटाले हे परिषदेत प्रमुख वक्ते असून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या परिषदेला मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे
Good
Good