एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई – गोरेगावातील नंदादीप विद्यालय ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते ओळखले जाते. शाळेत आत्तापर्यंत मूल्यशिक्षण, मी भारतीय, उत्सव, पर्यावरण इत्यादी विषयांवर ‘अभिनव शिक्षण महोत्सवा’चे आयोजन केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये बाणवली पाहिजेत या हेतूने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. विद्यार्थी दर शनिवारी एक तास आपल्या वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चार -पाच महिने काम करतात आणि त्यानंतर त्याचे प्रदर्शन या महोत्सवाच्या निमित्ताने मांडले जाते. या महोत्सवाला उपनगरातील अनेक शिक्षण प्रेमी नागरिक तसेच शाळा भेट देत
असतात. यावर्षी ‘कौशल्य विकास’ ही महोत्सवाची मूळ संकल्पना आहे.या अंतर्गत विद्यार्थ्यांनी ओरिगामी,कागद काम,टाकाऊतून टिकाऊ, लिप्पन आर्ट, मंडला आर्ट, कागदी पिशव्या, भेट कार्ड व कागदी फुले, कागदांचे रंगीबेरंगी विश्व, कागदांशी मैत्री, दगडांशी दोस्ती या विषयांवर काम केले आहे. दिनांक 19 व 20 डिसेंबर 2025 रोजी, शाळेत होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी व चित्रकार विनय वैद्य यांच्या हस्ते होणार असून शिक्षक आमदार ज मो. अभ्यंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.हे प्रदर्शन शिक्षण प्रेमी नागरिक व विविध शाळांमधील विद्यार्थी यांच्यासाठी 19 व 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत खुले राहील, असे अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यवाह माधुरी पाटील आणि नंदादीप विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन जगधने यांनी सांगितले.