प्रतिनिधी : मिलन शहा
पुणे, नगर रोड – शहरातील वाहतूक समस्या आणि वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता, वाको वेलफेअर असोसिएशन (टीम वाको) या समाजसेवी, लोक कल्याणकारी संस्थाने येरवडा ते वाघोली दरम्यानच्या नगर रोड मार्गावर AI (Artificial Intelligence) आधारित ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.
नगर रोड हा पुण्यातील एक महत्त्वाचा व सतत गजबजलेला मार्ग असून, येथे अनेक रहिवासी वसाहती, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, आयटी पार्क्स, मॉल्स इ. आहेत. परिणामी, या मार्गावर दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. सध्या अपुऱ्या व पारंपरिक ट्राफिक सिस्टीममुळे येथे वाहतूक कोंडी, सिग्नल उल्लंघन, चुकीची पार्किंग व अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
या समस्येच्या पार्श्वभूमीवर, टीम वाको ने पुणे महानगरपालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त (वाहतूक), पुणे शहर, तसेच मुख्य अभियंता (प्रकल्प) कार्यालय, पुणे महानगरपालिका यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
टीम वाको च्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- AI आधारित ट्राफिक सिग्नल नियंत्रण प्रणाली – वाहतुकीच्या वास्तव संख्येनुसार सिग्नल वेळेचे रिअल-टाईम ऑप्टिमायझेशन
- CCTV व AI वापरून सिग्नल उल्लंघन, चुकीची पार्किंग, व रोंग साईड वाहनचालकांवर तात्काळ कारवाई
- अपघातप्रवण ठिकाणांची सतत देखरेख व डायनॅमिक रिस्पॉन्स सिस्टम
- इमर्जन्सी वाहनांसाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ स्वरूपात सिग्नल क्लिअरन्स प्रणाली
- वाहतूक डेटाचे विश्लेषण करून धोरणात्मक सुधारणा व दीर्घकालीन योजना आखणे
- नगर रोडवरील अतिक्रमण व अनधिकृत रस्त्याच्या कडेला पार्किंगवर कठोर कारवाई
- सायकल ट्रॅक व पादचारी मार्गांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि देखभाल करणे
या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे नगर रोडवरील वाहतूक अधिक सुसंगत, सुरक्षित व गतिमान होईल, तसेच नागरिकांचा प्रवास वेळेत आणि त्रासमुक्त होईल, असा टीम वाको चा विश्वास आहे.
टीम वाको ने संबंधित यंत्रणांकडे लवकरात लवकर ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली असून, शहराच्या समृद्ध व शाश्वत विकासासाठी ही आवश्यकता अनिवार्य आहे, असेही नमूद केले आहे.
Good
Very good
Very good