प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई : केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला असून येत्या ३ वर्षात हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते मिरा- भाईंदर हे अंतर कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासात कापता येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले की, गेली ४-५ वर्ष सातत्याने केंद्रीय मिठागार मंत्रालय व राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे दहिसर- भाईंदर ६० मीटर रस्त्यामधील ५३.१७ एकर जागा केंद्रीय मिठागार मंत्रालयाने राज्य शासनाच्या माध्यमातून मीरा- भाईंदर महानगरपालिके कडे हस्तांतर करण्याची मान्यता दिली आहे. सहाजिकच दहिसर ते भाईंदर आणि पुढे वसई – विरार कडे जाणारा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर आता कोस्टल रोड मार्गे केवळ एक अर्ध्या तासावर आले आहे.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोस्टल रोड हा उत्तन पर्यंत येणार आहे. तेथून दहिसर -भाईंदर हा ६० मीटर रुंदीचा रस्ता मिरा रोड येथील सुभाष चंद्र बोस मैदानापर्यत येवून तिथून वसई विरार या दोन शहराला वसई विरार जोडला जाणार आहे.
या रस्त्याची निविदा प्रक्रिया यापूर्वीच काढली आहे.हे काम एल.ॲड टी. ही कंपनी करणार असुन, पुढील तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यासाठी येणारा ३ हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे . कोस्टल रोड हा उत्तन येथून विरार कडे समुद्रकिनाऱ्यावरून जाणाऱ्या मार्गाला तेथील कोळी बांधवांनी विरोध केला होता. ही मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या कडे मांडली आणि त्या मागणीला मान्यता मिळवली. त्यामुळे हा मार्ग उत्तन ते दहिसर आणि तेथून मीरा-भाईंदर मार्गे वसई विरारकडे जमिनीवरून जाणार आहे. त्यामुळे उत्तन येथील कोळी बांधवांच्या रास्त मागणीचा शासनाने सहानुभूती पुर्वक विचार केला आहे.असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. भविष्यात हा मार्ग वसई विरार च्या पुढे वाढवण बंदरापर्यंत जाणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा मीरा-भाईंदर शहराला होईल. तसेच मिरा – भाईंदर हे शहर मुंबईची अधिक जोडले जाईल आणि मुंबई शहराचे उपनगर म्हणून आपली ओळख निर्माण करेल! असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
Nice
Very use