
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई:भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या विधानाने संपूर्ण राज्याच्या अस्मितेला ठेच पोहोचवली आहे. या विरोधात संसद भवनाच्या लॉबीत थेट जाब विचारणाऱ्या काँग्रेसच्या रणरागिनी खासदार– खा. वर्षाताई गायकवाड, खा. प्रतिभाताई धानोरकर व खा. शोभा बच्छाव– यांचे आज मुंबई काँग्रेसतर्फे जाहीर अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी मुंबई काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सावंत यांनी केले. मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, अनुसूचित जाती विभागाचे मुंबई अध्यक्ष कचरू यादव, महासचिव महेंद्र मुणगेकर, प्रवक्ते निजामुद्दीन राईन, राजेश इंगळे, मंदार पवार, आनंद यादव, के. पी. सिंग, राजेश टेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सचिन सावंत यांनी म्हटले की, “महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्यांना सभागृहात जाब विचारणाऱ्या रणरागिनी खासदारांनी संपूर्ण राज्याची लाज राखली आहे. आजच्या काळात संसदेत अशा धाडसी आवाजांची गरज आहे. आम्ही त्यांचा अभिमान बाळगतो.”
मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस म्हणाले, “भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती, सभ्यता आणि समाजमनावर केलेला आघात असह्य आहे. या वक्तव्याची आम्ही निंदा करतो आणि संसदेसारख्या पवित्र ठिकाणी असे अपमानास्पद विधान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.”
या वेळी उपस्थित सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे भाजप खासदार दुबेंच्या विधानाचा निषेध करत “महाराष्ट्राच्या अस्मितेस गालबोट लावणाऱ्या प्रत्येकाचा विरोध होणारच” असा निर्धार व्यक्त केला. मुंबई काँग्रेसच्या वतीने या धाडसी महिला खासदारांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निषेध