निसर्गानुभव कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्रातर्फे दिनांक २७-२८ सप्टेंबर २०२५ रोजी निसर्गानुभव कार्यशाळा साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथे संपन्न झाली. प्रसिध्द जैवविविधता तज्ञ पार्थ बापट यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा भरवण्यात आली होती.

शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता कार्यशाळेची सुरुवात झाली. पावसाचा रेड अलर्ट असतानाही या निसर्गानुभव कार्यशाळेत चिपळूण, महाड, माणगाव, भीरा, नवी मुंबई व मुंबईतील जैवविविधता विषयात रुची असणारे सहभागी झाले होते. पहिल्या सत्रात पार्थ बापट यांनी सुरवातीलाच मानवी उत्क्रांतीचा इतिहास शिकवत असतानाच जैवविविधता व माणूस यातील संबंधही उलगडून दाखवला. जैवविविधता म्हणजे काय आणि तिच्या जतन संवर्धनाचे महत्व पार्थ बापट यांनी सोप्या शब्दांत मांडले व डॉ. दिप्ती बापट यांनी त्या मांडणीत तांत्रीक बाबी समजावून सांगितल्या. मुसळधार पावसाच्या तालावर चाललेलं हे सत्र कठीण विषय असूनही संपूच नये इतकं रंजक झालं होतं. रात्रीच्या जेवणानंतरच्या सत्रात वरील विषयांवरील तीन माहितीपट बघितले व त्यावर चर्चा केली.

रविवार सकाळ उजाडलीच रात्रभर पडत असलेल्या पावसातच. सकाळच्या पहिल्या सत्रात आदल्या दिवशीच्या अभ्यासावर आधारित निसर्ग खेळ व अभिव्यक्तीच्या अविष्कारातून विषय पक्के केले गेले. कार्यशाळेतील या सत्राचा सहभागींनी पुरेपुर आनंद घेतला. जैवविविधता या अवघड विषयाच्या अभ्यासात सहभागींची रुची वाढविणारे हे सत्र या विषयाला न्याय देणारे आणि म्हणूनच सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरले.

नाश्त्यानंतरचे सत्र हे प्रत्यक्ष निसर्गानुभव देणारे, परिसर भ्रमंतीचे सत्र. पावसाने थोडी उसंत घेतली आणि सर्वजण निघाले स्मारक परिसरातील वृक्ष वेली, प्राणी पक्षी यांची ओळख करुन घ्यायला. मुसळधार पावसामुळे पक्ष्यांनी दडी मारली असली तरी वृक्षवेलींमधले वैविध्य बघून सहभागींना स्मारक परिसरातील जैवविविधतेची कल्पना आली. स्मारका जवळच्या नदीपर्यंत असंख्य झाडांची ओळख बापटसर करुन देत होते. नदीजवळ गेल्यावर तिथल्या पाणथळ जागेबद्दल बोलताना बापट सरांनी त्या परिसंस्थेची माहिती तर दिलीच त्याचबरोबर नदीच्या स्वास्थ्याबद्दलही माहिती दिली. एका नवीनच जगाचा परिचय झाल्याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

नंतरच्या सत्रात पर्यावरण जतन व संवर्धन ह्याबद्दल विचार करायला लावणारी चर्चा छेडली गेली. ग्रीन एनर्जी म्हणजे काय? तिच्या आडून येणारे प्रकल्प व त्यामुळे होणारा प्रत्यक्ष पर्यावरणाचा ह्रास यावर चर्चा केली आणि उदाहरण म्हणून पवनऊर्जा वापर व उपयोग हा विषय चर्चेला घेतला. सहभागींनी या सत्रात संवादी भाग घेतला. एखाद्या भागातील जैवविविधता टिकविण्यासाठी काय काय करता येईल यावर सहभागींनी चर्चेत भाग घेतला.

या कार्यशाळेला स्मारकाचे माजी सचीव राजन इंदुलकर, कोषाध्यक्ष माधुरी पाटील तसेच स्मारक कार्यकर्ते उल्का व संतोष पुरोहित हे आवर्जून उपस्थित होते. कार्यशाळेत त्यांनी सक्रीय सहभाग दिला व महत्वाच्या सूचना केल्या. अशा प्रकारच्या कार्यशाळा यापुढेही स्मारकात आयोजित करण्यात येतील असा विश्वास राजन इंदुलकर यांनी व्यक्त केला. पार्थ बापट यांनी स्मारकात पर्यावरण छावणीच्या आयोजनाचे सूतोवाच यावेळी केले.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे सचीव राजेश कुलकर्णी यांनी समारोप सत्रात स्मारकाचा इतिहास व स्मारकाचे विविध उपक्रम यांची माहिती उपस्थितांना दिली व स्मारकाच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले. स्मारकाच्या विश्वस्त व जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्राच्या सदस्य सिरत सातपुते यांनी येत्या काळात जैवविविधता या विषयावरील खुल्या गटातील या कार्यशाळेबरोबरच विविध वयोगटातील विद्यार्थी, संशोधक व अभ्यासकांसाठीही विविध कार्यशाळांचे आयोजन केंद्रातर्फे केले जाईल अशी माहिती दिली. पार्थ बापट व दिप्ती बापट यांनी या कार्यशाळेमार्फत सुलभ भाषेत जैवविविधता हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व या विषयावरील स्मारकातील कार्यक्रमांत त्यांच्या सक्रीय योगदानात सोबतीची ग्वाही दिली. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी संयोजक मल्हार इंदुलकर व स्मारक टीमने मेहनत घेतली.


Share

2 thoughts on “निसर्गानुभव कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *