
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर भागांत पत्रकारांवर होत असलेले गैरवर्तन, अटकसत्रे आणि थेट शारीरिक हल्ले याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील पत्रकारांनी सोमवारी जोरदार आंदोलन छेडले. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियातील पत्रकार, फोटो-जर्नालिस्ट, व्हिडिओ-जर्नालिस्ट आणि संपादक मोठ्या संख्येने जमले होते. संतापजनक घोषणाबाजी करत पत्रकारांनी एकजुटीचे सामर्थ्य दाखवले.
आंदोलनात सहभागी पत्रकारांनी हल्ल्यांना थेट लोकशाहीवरील आघात म्हटले. “पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्यावर होणारे हल्ले म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा. मुंबई-पुण्यातील अलीकडच्या घटना अस्वीकार्य आहेत. आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि सरकारने तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी करण्यात आली.
‘पत्रकारांवर हल्ला बंद करा’, ‘पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कायदा हवा’, ‘पत्रकार विरोधी अधिकाऱ्यांचा निषेध असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनाने पत्रकारांच्या हक्कांसाठी लढण्याची एकजूट दाखवून दिली.
आंदोलनात सर्वस्वी विश्वरथ नायर, सुदिप घोलप, अनंत मिस्त्री, नागमनी पांडे, राजेंद्र बोडके, सुनील तावडे, विठ्ठल दळवी, दीपक सोनवणे, सनी मेहरोल, पुरुषोत्तम कनोजीया, कासीम सय्यद, फोरम जोशी, साईनाथ भोईर, अथर्व रणदिवे, समीर शेख, प्रकाश शिंदे, दीपक कांबळे, फारुख सय्यद, भरतकुमार कांबळे यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलक पत्रकारांनी स्पष्ट इशारा दिला की, “पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र आणि कठोर कायदे तातडीने लागू केले गेले नाहीत, तर राज्यभरात आणखी मोठी आंदोलने पेटवली जातील.” स्थानिक राजकीय नेत्यांकडूनही या मागण्यांना समर्थन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
आंदोलनात सहभागी विविध पत्रकार संघटनांच्या सदस्यांनी सांगितले की, हे आंदोलन केवळ नवी मुंबईपुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी एक ठोस संदेश आहे – “हक्कांसाठीचा लढा सुरू आहे आणि तो आता अधिक तीव्र होणार आहे.”
सरकारला लवकर शहाणपणा येऊ दे हां हल्ला म्हणजे संविधान वर हल्ला आहे
Nished