
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई: शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचा 106 वा वर्धापन दिन दिनांक 04 ऑक्टोबर 2025 रोजी सातारा येथील कर्मवीर समाधी परिसरात मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्यात संस्थेच्या वतीने विशेष कामगिरी करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
संस्थेतील उत्कृष्ट कार्यासाठी कर्मवीरांच्या हयातीत आणि नंतर विशेष योगदान दिलेल्या थोर व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये, यावर्षी प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालय (सह्याद्रीनगर) येथील पद्मनाभ अर्जुन चव्हाण या हरहुन्नरी विद्यार्थ्याने मा. दत्तूशेठ पाटील आदर्श विद्यार्थी पुरस्कारावर आपले नाव कोरले.
गरीब कुटुंबातून आलेल्या पद्मनाभचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्याने NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना) परीक्षेत मुंबई उपनगर जिल्ह्यातून दुसरा येऊन ₹48,000/- ची शिष्यवृत्ती मिळवली आहे. केवळ याच नव्हे, तर पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच रयत शिक्षण संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या रयत प्रज्ञाशोध परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येऊन त्याने रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती देखील प्राप्त केली आहे.
पद्मनाभचे यश केवळ अभ्यासापुरते मर्यादित नाही. तो मल्लखांब या भारतीय खेळातील एक गुणवान खेळाडू असून, मुंबईतील विविध स्पर्धांमध्ये त्याने यशस्वी सहभाग घेतला आहे. यासोबतच त्याने शासकीय चित्रकला परीक्षेत यश आणि मुंबईमधील विज्ञान प्रदर्शनामध्ये यशस्वी सहभाग घेऊन आपली बहुआयामी प्रतिभा सिद्ध केली आहे.
संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी साहेब (निवृत्त आय.ए.एस. अधिकारी), लोकनेते मा. रामशेठ ठाकूर साहेब, व्हाईस चेअरमन मा. भगीरथजी शिंदे साहेब इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत, कर्मवीर अण्णांचे नातू आणि संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील साहेब यांच्या शुभहस्ते पद्मनाभला सन्मानित करण्यात आले.
पद्मनाभच्या या उत्तुंग यशाबद्दल परिसरातील नागरिक, स्कूल कमिटी सदस्य, मुख्याध्यापिका सौ.जरे एस.एम., माजी विद्यार्थी संघ, विविध शालेय समित्यांचे सदस्य, शिक्षक, पालक तसेच विद्यार्थी यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. पद्मनाभला मिळालेला हा पुरस्कार प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयाच्या उच्च शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.
खुप खुप छान
Congrats