
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,रस्त्यांवर पडलेले खड्डे, अशुद्ध पाणी पुरवठा, विकास कामांमधील दिरंगाई अशा विविध विषयांवरुन पालिका प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी आज कॉंग्रेस मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या वतीने मनपा पी/ उत्तर विभाग कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा पाढाच वाचला.
प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य हैदरअली शेख आपल्या भाषणात म्हणाले, नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असते. मात्र एका वर्षाहून अधिक काळ निवडणूका न झाल्याने राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरु आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी व देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असूनही प्रशासकाच्या गलथान कारभारामुळे रस्ते, पाणी, नालेसफाई अशा सर्वच बाबतीत निराशाजनक परिस्थिती आहे. नागरिकांनी दाद मागायची तरी कुणाकडे..?
जनतेच्या इच्छा, आकांक्षां व अपेक्षांचं प्रतिबिंब महानगरपालिकेत उमटवण्यासाठी व प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी नगरसेवक असतात. मात्र निवडणूका न झाल्याने प्रशासनावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. महानगरपालिकेचे प्रशासक राज्य सरकाची कठपुतळी बाहुली असल्यासारखे काम करत आहेत.
आज जनतेच्या मनातील हीच खदखद व असंतोष आम्ही जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रकट केल्याचे हैदरअली शेख यांनी सांगितले.
मुंबई कॉंग्रेसचे सचिव संतोष चिकणे म्हणाले, सौंदर्यीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. मात्र मुलभूत सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचत आहे.
यावेळी परमिंदर सिंग भामरा, पंकज कपूर, गफूर कुरेशी, निर्मला शाह, संगीता ऍंथोनी, पूजा जवेरी, शरोन बरेतो, जकेरिया लकडावाला, महेश धावडे, विपुल शाह आदी पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
