
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ७ मार्च रोजी सह्याद्रीनगर कांदिवली येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी व पालकांसाठी आरोग्य प्रबोधन आणि तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित राहून महिलांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर विषयांवर मार्गदर्शन केले. भूलरोगतज्ज्ञ डॉ. अमोला पारेख (M.D. ॲनेसथेशिया), डॉ. पन्ना शहा (M.D. ॲनेसथेशिया) आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निलिमा इनामदार (M.D. Gynac) यांनी ‘सर्वायकल कॅन्सर’ (गर्भाशय मुखाचा कर्करोग) आणि ‘थॅलेसेमिया’ या विषयांवर अत्यंत मोलाची माहिती दिली. पालकांच्या आणि विद्यार्थिनींच्या मनातील शंकांचे निरसन करून या आजारांपासून बचाव कसा करावा, याबद्दल तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला डॉ. अनुजा निकम, रोटरी क्लब ऑफ मुंबई (कांदिवली वेस्ट) च्या अध्यक्षा शशिकला चार्ल्स (निवृत्त एच.आर. जनरल मॅनेजर, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया), रोटेरियन रिमा वाही, डॉ. किरण पारखे (पनवेल) आणि मदनराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शिल्पा जरे यांच्या भगिनी डॉ. अंजली निकम (पनवेल) यांनी ३५ पालक व विद्यार्थिनींच्या हिमोग्लोबीन तपासणीचा संपूर्ण आर्थिक भार उचलून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शिक्षिका सौ. सुविधा पाटील यांनी केले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित हा कार्यक्रम सर्व महिला पालक आणि विद्यार्थिनींसाठी आरोग्यदायी व माहितीपूर्ण ठरला. मुख्याध्यापिका सौ. शिल्पा जरे यांनी सर्व उपस्थित डॉक्टर्स आणि रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
छान