फिल्म सिटी हत्याकांड प्रकरणात सर्व ८ आरोपींची निर्दोष मुक्तता.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

गोरेगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
मुंबई : बहुचर्चित फिल्म सिटी हत्याकांडातील राजू उर्फ श्रीकांत शिंदे खून प्रकरणात गोरेगाव (दिंडोशी) येथील बोरीवली विभागाच्या सत्र न्यायालयाने सर्व आठही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. टी. टी. आगलावे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
सदर खटला गोरेगाव येथील आरे पोलीस ठाण्याच्या तपासावर आधारित होता. अभियोजन पक्षानुसार, फिल्म सिटी परिसरात सुरक्षा सेवा व्यवसाय करणाऱ्या श्रीकांत उर्फ राजू शिंदे यांच्यावर २२ मे २०१५ रोजी गोरेगाव आरे कॉलनीतील फिल्म सिटी परिसरात, कालिया मैदानाजवळ बालाजी टेलिफिल्म्सच्या सेटसमोर गोळीबार करण्यात आला होता. हेल्मेट घातलेले दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवरून येऊन त्यांनी राजू शिंदे यांच्यावर गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले होते.
या हल्ल्यात राजू शिंदे यांना तीन गोळ्या लागल्या असून त्यांना तात्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे ४५ दिवस उपचार सुरू असताना, ०२ जुलै २०१५ रोजी गोळीबाराच्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत २१ ऑगस्ट २०१५ रोजी आरोपपत्र सादर केले. हे प्रकरण सत्र खटला क्रमांक १८९/२०१५ म्हणून नोंदवण्यात आले.
न्यायालयाने सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, १२०-ब तसेच शस्त्र कायद्याच्या कलम २५ व २७ अंतर्गत आरोप निश्चित केले होते. या प्रकरणात सुरेश सुभाष गायकवाड यांना मुख्य सूत्रधार म्हणून दर्शविण्यात आले होते.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने एकूण ३८ साक्षीदार तपासले. मात्र उलटतपासणीदरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये गंभीर विसंगती आढळून आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीत फिर्यादी पक्षाने सांगितलेल्या तीन गोळ्यांच्या जखमांऐवजी शवविच्छेदन अहवालात चार गोळ्यांच्या प्रवेश जखमा आढळल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हल्ल्याच्या दिवसापासून मृत्यू होईपर्यंत राजू शिंदे हे वैद्यकीय देखरेखीखाली होते.
तसेच बॅलिस्टिक तज्ञांच्या साक्षीनुसार, जप्त करण्यात आलेली शस्त्रे ही कथित गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रांशी जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. तपास अधिकाऱ्यांच्या साक्षीतून हेही निष्पन्न झाले की, पीडिताचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवण्यात आला असल्याचा दावा असूनही तो जबाब न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नव्हता.
या सर्व त्रुटी आणि संशयास्पद बाबी लक्षात घेता अभियोजन पक्ष आरोप कोणत्याही रास्त शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करत न्यायालयाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले.
या प्रकरणात सुरेश सुभाष गायकवाड यांचे मुख्य प्रतिनिधित्व अ‍ॅड. श्रीकांत सुरेशराव शिरसाठ यांनी, तर जुगल उर्फ पप्पू बाबू धोडिया यांचे प्रतिनिधित्व अ‍ॅड. सपना दिलीप हजारे यांनी केले. तसेच सहकारी वकील म्हणून अ‍ॅड. रवींद्र सोपान लिहिणार, अ‍ॅड. नरेश मुरलीधर गायकवाड, अ‍ॅड. प्रशांत उषा वसंत जाधव आणि अ‍ॅड. आयुष रमाशंकर पांडेय यांनी काम पाहिले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *