
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मालाड (पश्चिम) येथील सोमवार बाजार परिसरात नवीन मच्छी मार्केट उभारूनही मासळी व मटन विक्रेत्यांना अद्याप जुन्या, पडीक आणि धोकादायक मार्केटमध्येच व्यवसाय करावा लागत असल्याने स्थानिक नागरिक आणि कोळी समाजामध्ये संताप व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, पी-उत्तर विभागातील या परिसरात गेल्या दहा वर्षांपासून जुने मच्छी मार्केट जीर्ण अवस्थेत आहे. याच लगत पालिकेने सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून नवीन, सुसज्ज मच्छी मार्केट उभारले. मात्र, आजपर्यंत अधिकृत मासळी विक्रेते आणि मटन दुकानदारांना त्या नव्या मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले नाही.
यामुळे “जर विक्रेत्यांना नवीन मार्केटमध्ये हलवायचेच नव्हते, तर लाखो रुपयांचा खर्च का केला?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सध्या जुन्या मार्केटची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून, छत कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणी रोज व्यवसाय करणाऱ्या कोळी भगिनींना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. ग्राहकांनाही धोका पत्करून येथे खरेदीसाठी जावे लागत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबत महानगरपालिकेच्या पी-उत्तर विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आहे.
दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व विक्रेत्यांचे नवीन मार्केटमध्ये स्थलांतर करावे, अशी मागणी केली आहे.
“जर आम्हाला नवीन मार्केटमध्ये जागा मिळाली तर चांगले होईल. सध्याच्या मार्केटमध्ये छत कोसळण्याची भीती आहे. नवीन मार्केटमध्ये काही सुविधा तरी मिळतील.”तसेच नवीन मार्केट च्या नावा खाली जर खासगी बिल्डर अथवा लोकांना ही जागा दिली तर अशी ही भीती आम्हाला वाटत आहे— कोळी महिला
“जुने मार्केट तोडून नवीन बांधावे आणि आधुनिक सुविधा द्याव्यात यासाठी २०१६ पासून पाठपुरावा करत आहे. मात्र पालिकेकडून स्पष्ट माहिती मिळत नाही. नवीन मार्केट तयार होऊन चार वर्षे झाली, तरी विक्रेत्यांना का हलवले जात नाही?” — संतोष चिकणे, महासचिव, मुंबई काँग्रेस

मला माहिती नाही काय कारण आहेत. तसेच पाणी का नाही या वर ही माहिती घेतो तसेच हे मार्केट कुठे आहे ते ही माहिती नसल्याचे उत्तर दिले -दिनेश यादव -मुख्य निरीक्षक बाजार खाते -पी -उत्तर विभाग.
“पाणी नाही’ कारणावरून अडथळा?
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मच्छी मार्केटमध्ये जलवाहिनीची व्यवस्था नसल्याचे कारण देत स्थलांतर रखडल्याचे सांगितले जाते. मात्र, पालिकेने उभारलेल्या मार्केटमध्येच पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी वर्षानुवर्षे लागत असतील, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.