भाजपाच्या राज्यात दलित, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचारात वाढ- काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस.

Share

प्रतिनिधी :मिलन शहा


अहमदनगरच्या हरेगाव घटनेतली गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
मिलन शह.
मुंबई, दि. २८ ऑगस्ट
अहमदनगर जिल्ह्यातील हरेगावात तीन दलित तरुणांना चोरीच्या संशयावरून झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारा आहे. भाजपाने मागील ९ वर्षात जाती धर्मात विष कालवले आहे त्याचाच हा परिणाम आहे. भाजपा सरकार केंद्रात व महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून दलित, अल्पसंख्याक, वंचित, आदिवासी समाजावर अत्याचार करण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.

नगर जिल्ह्यात हातावरचे पोट असलेल्या तीन दलित तरुणांना शेळी व कबुतराच्या चोरीच्या संशयावरून अमानुष मारहाण करण्यात आली. याआधी नांदेड जिल्ह्यातील बोंडार गावात अक्षय भालेराव या दलित तरुणाची हत्या करण्यात आली. मुंबईतील कुर्ला भागात राहणाऱ्या दोन तरुणांना नासिकमध्ये गोमांस घेऊन जात असल्याच्या आरोपावरून बेदम मारहाण करण्यात आली, या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका दलित तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात केली, यावेळी या गुंडांनी त्याच्या आईलाही सोडले नाही, त्यांच्यावरही अत्याचार करण्यात आले. भाजपा सरकार असलेल्या राज्यात अशा घटना सातत्याने होत आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्याने या घटना वाढत आहे. भाजपा जाणीवपूर्वक अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहे. हिंदु राष्ट्राच्या नावाखाली समाजा-समाजात भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे.
गुजरातमध्ये बिल्कीस बानोवर सामुहिक बलात्कार करुन तिच्या घरातील ७ लोकांची हत्या करण्यात आलेल्या घटनेतील ११ आरोपींना गुजरामधील भाजपा सरकारने जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्त केले. शिक्षेतून मुक्त केल्यानंतर या गुन्हेगारांचा जाहीर सत्कारही करण्यात आला. भाजपाची हिच मानसिकता वंचित, दलित, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचारात वाढ होण्यात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हरेगावातील दलित तरुणांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली पाहिजे. राज्यातील भाजपाप्रणित सरकार याकडे गांभिर्याने लक्ष देईल व भविष्यात दलित, वंचित व अल्पसंख्याक समाजातील लोकांवर अत्याचार होणार नाहीत याची खबरदारी घेईल अशी अपेक्षा आहे, असे राजहंस म्हणाले.


Share

One thought on “भाजपाच्या राज्यात दलित, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचारात वाढ- काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *