एसएमएस-प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मालाड (प.) व्यासवाडी परिसरातील मढ जेट्टी रोडवर उभ्या राहिलेल्या मोठ्या बेकायदेशीर आरसीसी बंगल्या विरोधात अखेर बीएमसीच्या पी/उत्तर विभागाने हातोडा चालवला आहे. परवानगीशिवाय मोकळ्या जागेवर बांधकाम सुरू असल्याचे आढळल्यानंतर पालिकेने महिनाभरापूर्वीच काम थांबवण्याची नोटीस बजावली होती. मात्र, बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याने गुरुवारी बीएमसीने कारवाई केली.
सदर ठिकाणी राजकीय नावे असलेले बॅनर लावून पालिकेची कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्ट्स फिरत होत्या. परिसरात दबावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तरीही पालिकेने दुसरी तपासणी करून उल्लंघनाची खात्री केली. त्यानंतर २४ तासांची मुदत देऊन अखेरीस बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. पथकात सहाय्यक अभियंता राजेश सोनवणे, उपअभियंता सुहास घोलप आणि कनिष्ठ अभियंता कृष्णा बडे यांचा समावेश होता.
“परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम खपवून घेतले जाणार नाही. भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांवर आणखी कठोर पावले उचलली जातील,” असा इशारा सहाय्यक महापालिका आयुक्त कुंदन वळवी यांनी दिला.
Good
Good