प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबईकरांचा आवाज दडपण्यासाठी मोदानी सरकारकडून पोलीस बळाचा वापर.
मुंबई, 23 जानेवारी
अदानीविरोधात सर्वसामान्य जनता आवाज उठवते तेव्हा मोदानी सरकार पोलीस यंत्रणेचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमिनीच्या लुटीविरोधात लोकशाही मार्गाने निदर्शने करत असताना अदानीचे एजंट भाजपा सरकारने पोलीसांना पुढे करुन आंदोलकांना रोखले, धक्काबुक्की केली. मुंबईकरांचा आवाज दडपण्याच्या अशा कोणत्याही प्रयत्नांना काँग्रेस भीक घालत नाही. मोदानी सरकारने कितीही प्रयत्न केले तरी कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन अदानीच्या घशात जाऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
कुर्ल्यातील मदर डेअरी मध्ये बोटॅनिकल गार्डन व्हावे हा स्थानिक नागरिकांचा प्रस्ताव डावलून अदानीच्या घशात भूखंड घालण्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने कुर्ल्यात निषेध मोर्चा काढला होता. हा मोर्चा पोलिसांनी अडवला, यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मदर डेअरीच्या जमिनीवर अनेक वर्षापासून असलेली शेकडो झाडांची कत्तल करुन हा भूखंड अदानीला दिला जात आहे. मुंबईत प्रदुषण वाढत आहे आणि दुसरीकडे सरकार अदानीसाठी शेकडो झाडांची कत्तल करत आहे. या जागेवर गार्डन करावी ही जनतेची मागणी आहे. परंतु केंद्रातील व राज्यातील भाजपाचे सरकार हे अदानीसाठी काम करत असल्याने सामान्य मुंबईकरांचा आवाज ऐकत नाही. मुंबईकरांच्या हक्कावर गदा आणून अदानीला फायदा पोहचवण्यासाठी भाजपा सरकार काम करत आहे आणि काँग्रेस पक्ष मात्र मुंबईकरांच्या हक्कासाठी लढत आहे.
कुर्ल्यातील स्थानिक लोकांच्या भावना मांडत असताना मोठ्या पोलीस फौजफाट्यासह सरकारने दडपशाही केली. लोकप्रतिनिधींनाही बोलू दिले नाही. एकीकडे लाडकी बहिण म्हणायचे आणि याच लाडक्या बहिणींना भाजपा सरकारच्या पोलिसांनी धक्काबुक्की केली. पोलिसांच्या धक्काबुक्कीत खासदार वर्षा गायकवाड यांच्या पायाला जखमी झाली. अदानीविरोधात जनता लढा देत असताना पोलीसांचे यात काय काम आहे. मुंबईत सेलिब्रिटीपासून सर्वसामान्य मुंबईककर सुरक्षित नाही, तेथे पोलीसांचा वापर केला जात नाही पण आपल्या हक्कासाठी मुंबईकर आवाज उठवत असेल तर मात्र त्याविरोधात हेच पोलीस बळाचा वापर करतात याचा आम्ही निषेध करतो आणि अदानीच्या विरोधातील संघर्ष चालूच ठेवू असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.