मराठवाड्यात टच संस्थेकडून ६९५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

Share

अतिवृष्टीत सर्व काही वाहून गेलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी “शैक्षणिक मदत म्हणजे मुलाच्या भविष्याची दिवटी” – टच

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, या आपत्तीचा सर्वाधिक परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाला आहे. वह्या, पुस्तके आणि शालेय बॅगा वाहून गेल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वप्न थांबण्याच्या उंबरठ्यावर आले.

या पार्श्वभूमीवर “TOUCH – Turning Opportunities for Upliftment and Child Help” ही संस्था शिक्षणाचा दिवा पुन्हा पेटवण्यासाठी पुढे सरसावली आहे. संस्थेच्या वतीने मराठवाड्यातील विविध भागांत एकूण ६९५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यात जालना जिल्ह्यातील गोळेगाव येथे २५२, बीड जिल्ह्यातील मंजरथ येथे ५७, तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील देवगाव, वडनेर, लोहारा, वाघेगव्हाण या गावातील ३८६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले.

या किटमध्ये वह्या, पेन, कंपासपेटी, शालेय बॅग व इतर आवश्यक साहित्याचा समावेश करण्यात आला होता.

या उपक्रमाबाबत बोलताना टच संस्थेचे समन्वयक उमाकांत पांचाळ म्हणाले, “टच संस्थेची ही मदत केवळ साहित्यापुरती मर्यादित नाही, तर ती एका मुलाचे भविष्य उजळवणारी दिवटी आहे. मुलांच्या हातात पुन्हा शालेय साहित्य देणे म्हणजे त्यांच्या जीवनात आशेचा किरण परत आणणे होय. समाजातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने अशा वेळी एक पाऊल पुढे टाकले, तर कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही.”

गेल्या ३२ वर्षांपासून ग्रामीण आणि आदिवासी भागात कार्यरत असलेली टच संस्था शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.
या आपत्तीच्या काळात संस्थेच्या ट्रस्टींच्या मार्गदर्शनाखाली आणि समाजातील दात्यांच्या सहकार्याने हा मदत उपक्रम राबविण्यात आला.

शालेय साहित्य मिळाल्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर पालकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. “आमच्या लेकरांचे शिक्षण थांबणार नाही,” अशी दिलासा देणारी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या उपक्रमासाठी प्रफुल पालांडे आणि शिवशंकर शेरे यांनी विशेष परिश्रम घेतले, तर सिद्धार्थ महाविद्यालय, चर्चगेटच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) स्वयंसेवकांनी साहित्य वितरणात सक्रिय सहभाग नोंदवला.


Share

3 thoughts on “मराठवाड्यात टच संस्थेकडून ६९५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *