मराठी महापौराच्या मागणीसाठी २ व ३ ला भव्य मोर्चा

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मीरा -भाईंदर : मीरा–भाईंदर महानगरपालिकेवर मराठी महापौराची नियुक्ती व्हावी या रास्त मागणीसाठी मराठी एकीकरण समिती, मनसे, शिवसेना (उबाठा) तसेच विविध मराठी संस्था आणि मराठी जनतेच्या वतीने येत्या दि. २ फेब्रुवारी रोजी शांततामय आंदोलन आणि दि. ३ फेब्रुवारी रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती आज देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समिती तसेच मनसे आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आंदोलन व मोर्चाबाबतचे लेखी निवेदन सादर केले. सदर आंदोलन आणि मोर्चा पूर्णतः शांततेच्या मार्गाने होणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
दि. २ फेब्रुवारी रोजी भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानात मराठी नागरिकांचा शांततामय जमाव व आंदोलन होणार आहे.
तर दि. ३ फेब्रुवारी रोजी सुभाषचंद्र बोस मैदान येथून मीरा–भाईंदर महानगरपालिकेपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चामधून एकच ठाम आणि स्पष्ट मागणी मांडली जाणार आहे—
“मीरा–भाईंदर महानगरपालिकेवर मराठी महापौर बसवावा.”
शहरात मराठी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असतानाही सातत्याने मराठी समाजाला डावलले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मराठी भाषा, अस्मिता आणि शहराची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी हा लढा उभारण्यात येत असून, हा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून मराठी भाषिकांच्या हक्क व सन्मानासाठी असल्याचे समितीने स्पष्ट केले.
लोकशाही मार्गाने मांडल्या जाणाऱ्या मराठी जनतेच्या भावनांची प्रशासनाने योग्य दखल घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.


Share

One thought on “मराठी महापौराच्या मागणीसाठी २ व ३ ला भव्य मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *