महसूल समाधान शिबिर,:एका दिवसात १७६५ नागरिकांना सेवा

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ (टप्पा क्र. १) अंतर्गत बोरीवली तालुक्यातील दहिसर येथे शनिवारी भव्य महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एका दिवसात तब्बल १७६५ नागरिकांना विविध महसूल सेवा देण्यात आल्या.

शिबिराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल , आमदार मनीषा चौधरी , मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी  यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत शिबिरातील सुविधांची माहिती घेतली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , राज्यमंत्री योगेश कदम , मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार  व उपपालकमंत्री मंगल प्रभात लोढा  यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात नागरिकांना डोमिसाईल, उत्पन्न व ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना प्रमाणपत्र, जिवंत सात-बारा मोहीम, प्रलंबित फेरफार, डिजिटल सात-बारा वितरण तसेच मिळकत पत्रिका व फेरफार नोंदी यांसारख्या विविध महसूल सेवा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.

मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आणि बोरीवलीचे तहसीलदार ईरेश चप्पलवार यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दहिसर येथे नागरिकांसाठी सोयीस्कर पद्धतीने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. एका ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच तहसीलदार ईरेश चप्पलवार व त्यांच्या संपूर्ण टीमचे त्यांनी विशेष कौतुक केले.

दरम्यान, महसूल विभागाच्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली असून अनेकांची प्रलंबित शासकीय कामे एका दिवसात पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *