महाराष्ट्रातील बंदरांच्या विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांची अंमलबजावणी

Share

प्रतिनिधी:कांचन जांबोटी

बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांची केरळचे बंदरे मंत्री अहमद देवरकोविल यांनी घेतली भेट

मुंबई, महाराष्ट्रात बंदर विकासाच्या क्षेत्रामध्ये विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांची अंमलबजावणी सुरु असून त्यातून भरीव कामे सुरू आहेत, असे राज्याचे बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी आज सांगितले.

केरळचे बंदरे मंत्री अहमद देवरकोविल यांनी आज बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्राच्या बंदरे विकासाची माहिती जाणून घेतली. त्यावेळी शेख बोलत होते.

बंदर विकासाच्या क्षेत्रामध्ये भविष्यातील प्रस्तावित प्रकल्प, अलिकडच्या काळात जलवाहतूकीच्या क्षेत्रामध्ये राज्याच्या बंदर विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले उपक्रम आदींसंदर्भात विस्तृत सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या बंदरे क्षेत्रातील प्रवासी, माल वाहतूक आणि त्यातून मिळणारा महसूल, शासनाने उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधांबद्दल केरळचे मंत्री देवरकोविल यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र मेरिटाईम मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमित सैनी, केरळ मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलीम कुमार आदी उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *