मालाड स्थानक हत्या प्रकरणात आरोपीला बेड्या..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई : मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी घडलेल्या एका अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेत किरकोळ वादातून ३३ वर्षीय प्राध्यापकाची चाकूहल्ल्यात निर्घृण हत्या करण्यात आली. आलोक कुमार सिंग असे मृत प्राध्यापकाचे नाव असून ते विलेपार्ले येथील एन. एम. कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
प्राप्त माहितीनुसार, सिंग हे लोकल ट्रेनमधून उतरतानाच आरोपी ओंकार शिंदे याच्याशी त्यांचा किरकोळ वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने अचानक धारदार शस्त्र काढून सिंग यांच्या पोटात जोरदार वार केला. गंभीर जखमी अवस्थेत सिंग हे जागीच कोसळले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या १२ तासांच्या आत आरोपी ओंकार शिंदे (वय २७) याला अटक करण्यात आली. आरोपी मालाडमधील कुरार व्हिलेज परिसरात राहणारा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेमुळे मालाड रेल्वे स्थानक परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वाढत्या हिंसाचारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे स्थानकांतील सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस बंदोबस्ताबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास मालाड रेल्वे पोलिसांकडून सुरू असून, आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Share

2 thoughts on “मालाड स्थानक हत्या प्रकरणात आरोपीला बेड्या..

  1. खरच लोकाना आता कसली ही भिती वाटत नाहि जो पर्यंत शासन अशा गुनेहगाराना फासावर चढवत नाही हे लोग काहि हि सांगुन बेल घेउन बिनदासत समाजात वावरतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *