मिरा-भाईंदर मध्ये उभारणार अत्याधुनिक ३७७ बेडचं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल!

Share

प्रतिनिधी : मिलन शहा

मीरा-भाईंदर :मीरा रोड हटकेश परिसरात १४ मजली अत्याधुनिक व ३७७ बेडचं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याची खुशखबर आज महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मंत्री मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी दिली असून या हॉस्पिटलसाठी एकही रुपया महानगरपालिकेचा खर्च होणार नसून सर्व खर्च शासनामार्फत केला जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ठाणे जिल्हा व MMR क्षेत्रातील हे पहिले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल असणार असून स्थानिक नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.

या हॉस्पिटलमध्ये ३०० जनरल बेड, ५० ICU बेड उपलब्ध होणार आहेत. तसेच डॉक्टर, नर्स यांच्यासाठी निवास व्यवस्था व पॅरामेडिकल कॉलेजची सुविधाही या ठिकाणी असणार आहे. शासनामार्फत TDR च्या माध्यमातून हे हॉस्पिटल उभारले जात असून, सुमारे ३.३० लाख चौ. फुटांच्या या इमारतीसाठी महानगरपालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. इतकंच नव्हे तर वैद्यकीय उपकरणांचा खर्च देखील शासनामार्फत केला जाणार आहे.

पुढील ३ वर्षांपर्यंत या हॉस्पिटलचे काम पूर्ण होणारा असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव जिल्हा मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, “लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघाला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी सातत्याने पार पाडत आहे. आता या अत्याधुनिक हॉस्पिटलसह मिळालेल्या सुविधा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी, अशी माझी अपेक्षा आहे.”

त्याचबरोबर मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या हॉस्पिटलच्या दुरावस्थेवरही त्यांनी आयुक्तांना तत्काळ दौरा करून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या.

“मीरा-भाईंदर महानगरपालिकेला सक्षम होण्यासाठी शासनामार्फत आम्ही या नव्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ही मोठी संधी उपलब्ध करून देत आहोत. योग्य नियोजन आणि जबाबदारीने काम करून महानगरपालिका नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देईल, असा माझा विश्वास आहे,” असेही मंत्री सरनाईक म्हणाले.


Share

2 thoughts on “मिरा-भाईंदर मध्ये उभारणार अत्याधुनिक ३७७ बेडचं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *