मुंबईत गॅसटंचाईत स्वयंपाकासाठी नवा पर्याय!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे.

मुंबई :गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत ‘देश का इंधन’ या बायोफ्यूल कुकिंग कोल व आधुनिक स्टोव्ह प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. वाढत्या गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, ढाबे तसेच मोठ्या कार्यक्रमांतील स्वयंपाकासाठी हा पर्याय उपयुक्त ठरणार असल्याचा दावा करण्यात आला.

एसएसके भारत  तर्फे मालाड पूर्व येथे आयोजित पत्रकार परिषदेत या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. कंपनीचे संचालक कार्तिक  रावल  यांनी सांगितले की, “देश का इंधन हे केवळ उत्पादन नसून ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल आहे. पारंपरिक एलपीजीवरील अवलंबित्व कमी करून किफायतशीर व सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.”

गेल्या काही काळात रसोई गॅसच्या अनियमित पुरवठ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यवसायिक, फेरीवाले व केटरिंग क्षेत्र अडचणीत आले आहे. विवाहसोहळे व मोठ्या कार्यक्रमांमध्ये स्वयंपाक व्यवस्थेबाबत अनिश्चितता निर्माण होत होती. अशा वेळी या नव्या प्रणालीमुळे दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या बायोफ्यूल कुकिंग कोलसोबत वापरण्यात येणारा स्टोव्ह आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आला असून, तो एलपीजी गॅस बर्नरप्रमाणेच वापरण्यास सुलभ असल्याचा दावा करण्यात आला. जलद व नियंत्रित स्वयंपाक करता येतो, तसेच धूर, राख किंवा कचरा कमी प्रमाणात निर्माण होतो, असेही सांगण्यात आले. पर्यावरणपूरक व शाश्वत ऊर्जेला चालना देणारा हा पर्याय असल्याचेही नमूद करण्यात आले.

मुंबईत दररोज लाखो नागरिक हॉटेल व लहान खाद्य व्यवसायांवर अवलंबून आहेत. या नव्या तंत्रज्ञानामुळे गॅसअभावी होणारे अडथळे कमी होऊन व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच मोठ्या समारंभांमध्येही स्वयंपाक व्यवस्थेबाबतची अनिश्चितता कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


Share

2 thoughts on “मुंबईत गॅसटंचाईत स्वयंपाकासाठी नवा पर्याय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *