राज्यस्तरीय अभंगवारी २०२५उत्साहात संपन्न.

Share

प्रतिनिधी : कृष्णा वाघमारे

मुंबई : संगीतवर्षा कला प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘अभंगवारी २०२५ या अभंग गायन स्पर्धेची अंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी नेहरू नगर, कुर्ला (पूर्व) येथील प्रबोधन प्रयोगघर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
राज्यभरातून सव्वाशेहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तीन टप्प्यात पार पडलेल्या निवड प्रक्रियेनंतर अंतिम फेरीस २१ उत्कृष्ट अभंगगायकांची निवड करण्यात आली. या कलाकारांनी संत साहित्यावर आधारित अभंगांचे सुमधुर सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भजनसम्राट महादेव शहाबाजकर उपस्थित होते, तर ज्येष्ठ शाहीर विष्णू गिलबिले आणि बबन शेळके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून स्पर्धकांचे अभिनंदन केले. त्यांनी संत परंपरेच्या जतनासाठी अशा उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक केले.यावेळी लोकप्रतिनिधी भाऊ कोरगावकर यांनीही स्पर्धेला भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी संगीतवर्षा कला प्रतिष्ठानच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत पुढील वर्षी स्पर्धेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या सोहळ्यात पखवाज वादक विक्रांत देशमुख यांच्या प्रभावी पखवाज वादनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. स्पर्धेचे परीक्षण प्रदीप चिटणीस आणि माधुरी पवार यांनी केले. आदित्य खवणेकर-हार्मोनियम, संजय नाईक-तबला, रमेश सावंत-पखवाज वादनाची साथ केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीतवर्षा कला प्रतिष्ठानच्या संस्थापिका वर्षा जाधव, अध्यक्ष काकासाहेब जाधव, तसेच राजू शिंदे, अभय जगताप, योगेश जगदाळे, उज्वला शिवरकर, विशाल राजगुरु, संतोष साखरे, श्रीराम कुळकर्णी, विश्वनाथ पांचाळ, विशाल गिलबिले, उत्तम कोळंबेकर, सुशीला गांगुर्डे आणि सीमा सावंत यांच्या परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले.
संगीतवर्षा कला प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय गायन स्पर्धा आयोजनाचे हे सलग तिसरे वर्ष असून, संस्थेच्या या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळत आहे आणि संत साहित्याची अभंग परंपरा अधिक बळकट होत आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी अनेक सामाजिक बांधव, रसिक श्रोते, कलाकार आणि शुभचिंतकांनी आर्थिक तसेच संगीत सेवा देऊन सहकार्य केले. त्यांच्या या नि:स्वार्थ योगदानामुळेच कार्यक्रम भव्य आणि यशस्वीपणे पार पडला.


Share

2 thoughts on “राज्यस्तरीय अभंगवारी २०२५उत्साहात संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *