राज असरोंडकर यांना NAPM चा संपूर्ण पाठिंबा.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

उल्हासनगर स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथून सन्मानपूर्वक हटवून योग्य ठिकाणी स्थापित करावा, या मागणीसाठी कायद्याने वागा लोक चळवळीचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर 1 एप्रिल 2026 पासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. राज असरोंडकर यांच्या बेमुदत उपोषणास जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाने (NAPM) संपूर्ण पाठिंबा दिला आहे. NAPM ने जिल्हाधिकारी, ठाणे व आयुक्त, उल्हासनगर महानगर पालिका यांना पत्र लिहून सदर पुतळा स्मशानातून हलवून योग्य जागी बसवावा. तसेच या सर्व प्रकारामध्ये बेकायदेशीर वर्तन करणारे व या प्रकाराकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.

भारतरत्न संविधान निर्माते आणि मानवतेचे उदगाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उल्हासनगर येथे बेकायदेशीररित्या स्मशानात बसवण्यात आला आहे. ‘अव्यवस्थितपणाला व्यवस्थित उत्तर’ असे ब्रीदवाक्य असलेल्या कायद्याने वागा लोक चळवळीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथून सन्मानपूर्वक हटवून योग्य ठिकाणी स्थापित करावा या मागणीसाठी गेले वर्षभराहून अधिक काळापासून अत्यंत सनदशीर मार्गाने संवाद, प्रबोधनाचे काम केले. मात्र प्रशासन या न्याय्य मागणीसाठी ढिम्म हलले नाही. त्यामुळेच प्रकृती साथ देत नसताना देखील राज असरोंडकर यांना बेमुदत उपोषण करून आपले प्राण पणाला लावावे लागत आहेत.

कुणाही समंजस आणि संवेदनशील नागरिकास सहज पटेल अशी रास्त मागणी घेऊन राज असरोंडकर यांना उपोषणाला बसावे लागत आहे हे प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे असे NAPM ने आपल्या पत्रात म्हटले आहे. स्मशानात संविधानकार्त्यांचा पुतळा बसवण्याचे नीच कृत्य करण्यास जबाबदार व्यक्तींना जेरबंद करून पुतळा योग्य ठिकाणी पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच आंदोलनकर्त्यांसोबत लागलीच संवाद साधून सौहार्दाने त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, सदर पुतळा स्मशानातून तत्काळ हलवून योग्य जागी बसवावा. तसेच या सर्व प्रकारामध्ये बेकायदेशीर वर्तन करणारे व या प्रकाराकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मागण्या सदर पत्रद्वारे करण्यात आल्या आहेत.

NAPM च्या महाराष्ट्र समन्वयक सिरत सातपुते यांनी राज असरोंडकर यांची उपोषण स्थळी भेट घेऊन त्यांना सदर पत्राची प्रत दिली व जाहीर पाठिंबा व्यक्त केला. तसेच पुतळ्याच्या राजकारणात कायद्याने वागा लोकचळवळीने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. ‘आर या पार’ या निर्धाराने उपोषणास बसलेल्या राज असरोंडकर यांच्या सनदशीर मार्गाने चाललेल्या या आंदोलनाचा दबाव सरकारवर पडेल असे आशादायक चित्र तयार होताना दिसत आहे. विविध पक्ष व जन संघटनांनी या आंदोलनाला दिलेला पाठिंबा व सामान्य नागरिकांनी या आंदोलनाला दिलेला प्रतिसाद पाहता हे आंदोलन सरकारला भारी पडेल हे निश्चित.

सिरत सातपुते
जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय
4 एप्रिल 2026


Share

One thought on “राज असरोंडकर यांना NAPM चा संपूर्ण पाठिंबा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *