प्रतिनिधी :मिलन शहा
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत.
जनतेला प्रशासकराज नको तर स्वतः निवडलेले लोकप्रतिनिधी हवे.
मुंबई, दि. 6 मे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रातील जनतेला प्रशासकराज नको आहे. जनतेला स्थानिक पातळीवर स्वतःचे लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. मा. न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकशाहीत जनतेचा आवाज सर्वोच्च असतो आणि तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अधिक बळकट होतो. पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात महापालिका व नगरपालिका, परिषदांमध्ये निवडणुका न घेता प्रशासक राज चालवला जात आहे त्यामुळे लोकशाहीतील लोकांचा थेट सहभाग संपत चालला आहे. प्रशासन आणि जनतेमधला संवाद तुटला आहे आणि त्याचे दुष्परिणाम सामान्य नागरिकांना रोजच्या आयुष्यात भोगावे लागत आहेत.सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय म्हणजे राज्यात लोकशाहीच्या पुनरुज्जीवनाची नांदी आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करून पंचायत राज व्यवस्था लागू केली होती. ओबीसी आरक्षणामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. आपली सत्ता आली तर दोन महिन्यात आरक्षण आणू व निवडणुका घेऊ अशा वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या पण अखेर न्यायालयानेच निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवेल असा विश्वासही खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
Good