वरळी मेट्रो स्थानकाला पंडित नेहरूंचे नाव द्या अन्यथा धडा शिकवू.

Share

प्रतिनिधी : मिलन शहा

मुंबई : वरळी भागात नेहरू सायन्स सेंटर या नावाने ओळख असताना मुंबई मेट्रोने या स्थानकाच्या नावातून नेहरु नाव वगळले आहे. नेहरू या नावाची अॅलर्जी असल्यामुळे भाजपने मुद्दामहून ते नाव वगळून केवळ सायन्स सेंटर असे ठेवले आहे. ही बाब अत्यंत आक्षेपार्ह असून भारताचे पहिले पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे नेते भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरूजीचा हा मोठा अवमान आहे. या मेट्रो स्थानकाला नेहरु सायन्स सेंटर नाव द्या, अन्यथा काँग्रेस आपल्या पद्धीतने धडा शिकवेल, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

यासंदर्भात भाजपा सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई मेट्रो ३ यांच्या ट्विटमध्येही ‘डिस्कव्हरी हब्स’ यादीत या ठिकाणाचे नाव नेहरू सायन्स सेंटर असेच दाखवले आहे. पण स्टेशनच्या नावातून नेहरु नाव वगळले आहे. नेहरुंचे नाव वगळून भाजपने संकुचित, सूडबुद्धीचा आणि असहिष्णू दृष्टिकोन दाखवून दिला आहे. दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे नाव बदलून प्राईम मिनिस्टर्स म्युझियम करण्यात आले, नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) चे नाव बदलून माय भारत करण्यात आले आणि अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आले.

खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, भारताला आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टी देण्यात नेहरुंचे योगदान अतुलनीय आहे. नेहरू यांचे कर्तृत्व एवढे महान आणि अढळ आहे की भाजपाने त्यांच्या विषयी कितीही दुस्वास दाखवला किंवा चारित्र्यहननाचा प्रयत्न केला, तरी ते प्रयत्न आभाळावर थुंकण्यासारखेच ठरतील.भारताच्या महान नेत्यांशी आणि राष्ट्रनिर्मात्यांशी होत असलेली ही वागणूक संपूर्ण जग पाहत आहे. भाजपची ही विकृत मानसिकता केवळ इतिहास पुसण्याचे काम करत नाही तर देशाच्या प्रतिष्ठेला आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाही धक्का पोहोचवत आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.


Share

3 thoughts on “वरळी मेट्रो स्थानकाला पंडित नेहरूंचे नाव द्या अन्यथा धडा शिकवू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *