प्रतिनिधी: मिलन शहा
नवी दिल्ली :आज दिनांक 28 जुलै 2025 रोजी लोकसभेत नियम 377 अंतर्गत खासदार प्रो. वर्षा एकनाथ गायकवाड यांनी देशातील युवकांमध्ये वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आणि अशा व्यसनमूलक गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर त्वरित प्रतिबंध लावण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.
त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, “Game of Skill” म्हणून वैध ठरवले जाणारे हे ऑनलाइन गेम्स प्रत्यक्षात जुगाराचे स्वरूप घेत असून, त्यात जिंकण्याची शक्यता केवळ 0.00006% इतकी अल्प आहे. त्यामुळे अनेक युवक फसून यामध्ये अडकत असून त्यांच्या मानसिक आरोग्यावर, शिक्षणावर आणि कौटुंबिक जीवनावर विपरित परिणाम होत आहे.
प्रो. गायकवाड यांनी पुढे नमूद केले की, एकट्या एका गेमिंग कंपनीने ₹6384 कोटी रुपये GST भरल्याचे स्पष्ट झाले आहे, म्हणजेच त्यांचे एकूण उत्पन्न किती मोठ्या प्रमाणावर असेल याचा अंदाज लावता येतो. तरीही या क्षेत्रातील कंपन्यांनी ₹1.12 लाख कोटी रुपयांची करचोरी केल्याचे उघड झाले असून केंद्र सरकारकडून यावर कठोर कारवाई झालेली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील एक मंत्री स्वतः अधिवेशन चालू असताना ऑनलाइन गेम खेळताना दिसले होते, हे शासनाच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
प्रा. वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, अशा गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर त्वरित बंदी घालण्यात यावी, करचोरी करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि देशातील युवकांना या चक्री वळणातून वाचवण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
Gooddemand