प्रतिनिधी -एसएमएस -मिलन शहा
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील विकासनिधी वाटपात सत्ताधाऱ्यांकडून पक्षपातीपणा केला जात असून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सर्व पक्षांच्या नगरसेवकांना समान निधी द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार Varsha Gaikwad यांनी केली आहे.
महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर विकासनिधी वाटपात मोठी तफावत दिसून येत असल्याचे त्या म्हणाल्या. सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांवर कोट्यवधी रुपयांची खैरात केली जात असताना काँग्रेस नगरसेवकांना अवघ्या काही लाखांवर समाधान मानावे लागत आहे. बीएमसीचा निधी हा मुंबईकरांचा असून तो कोणत्याही पक्षाचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थायी समितीला मिळालेल्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या निधीतून सत्ताधाऱ्यांना मोठा वाटा देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपाचे सभागृह नेते गणेश खणकर व स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना प्रत्येकी २० कोटी रुपये, तर उपमहापौर संजय घाडी यांना १० कोटी रुपये देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भाजपाच्या नगरसेवकांना प्रत्येकी २.२५ कोटी रुपये देण्यात आले, तर अनेक विरोधी नगरसेवकांना केवळ २५ लाख रुपयांवर समाधान मानावे लागल्याचे त्या म्हणाल्या.
याउलट समाजवादी पक्ष, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नगरसेवकांना तुलनेने अधिक निधी देण्यात आल्याचे सांगत भाजपाचे या पक्षांशी काय हितसंबंध आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विरोधी पक्षांचे नगरसेवकही जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. त्यांना कमी निधी देणे म्हणजे त्या भागातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. विकासनिधी हा कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्यांचा वैयक्तिक पैसा नसून तो मुंबईकरांचा हक्काचा निधी आहे, असे सांगत या प्रकरणी काँग्रेस पक्ष जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार गायकवाड यांनी दिला.