एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोर्ले
मुंबई :भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी, २६ जानेवारी १९५० रोजी भारताने स्वतःला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले आणि लोकशाही शासनव्यवस्थेची स्थापना झाली.
या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून दिल्लीतील कर्तव्य पथ (पूर्वीचा राजपथ) येथे भव्य संचलन आणि कवायतींचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्धस्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून सोहळ्याची सुरुवात केली.
या वेळी राष्ट्रपती मा. द्रौपदी मुरमु, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, मान्यवर पाहुणे आणि परदेशी प्रतिनिधी उपस्थित होते.
संचलनात भारतीय लष्कराच्या घोडदळ पथकासह आधुनिक सुरक्षा वाहने, रणगाडे, भारतीय पायदळाची वाहने, तोफखाना, तसेच ब्रह्मोस, आकाश यांसारखी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, संरक्षण अभियांत्रिकीतील प्रगती आणि विविध प्रकारचे ड्रोन सादर करण्यात आले.
सैन्यदलांच्या कवायतींमध्ये राजपुताना रायफल्स, आसाम रायफल्स, जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्री, बॉम्बे इंजिनिअर रेजिमेंट, कमांडो दल, नौदल, वायुदल, तटरक्षक दल, सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), दिल्ली पोलीस, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), एनएसएस तसेच औद्योगिक सुरक्षा दल यांनी शानदार सहभाग नोंदवला.
याशिवाय देशातील विविध राज्ये, केंद्र सरकारची मंत्रालये व विविध क्षेत्रांतील प्रगती दर्शवणारे आकर्षक चित्ररथही यावेळी सादर करण्यात आले.
दरम्यान, नुकतेच अवकाशात झेपावलेले वायुदलातील जवान मा. सुधांशू शुक्ला यांना विशेष “अशोक चक्र” या सन्मानाने गौरविण्यात आले.
आजच्या या भव्य सोहळ्यासाठी परदेशी पाहुणे म्हणून मा. अँथनी लायन हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
Happyrepublicdayto all