
रशियात जाऊन अण्णाभाऊंच्या पुतळ्याचे अनावरण करणाऱ्या फडणवीसांनी त्यांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे:- सुरेशचंद्र राजहंस
प्रतिनिधी:मिलन शाह
मुंबई,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल जगाने घेतली. रशियातील मास्कोमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णाभाऊंच्या पुतळ्याचे अनावरण झाले ही घटना महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. परंतु अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांचा योग्य सन्मान कधी केला जाणार आहे, असा रोखठोक सवाल मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी विचारला आहे.
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा ही मागणी राज्यातील अनेक मान्यवरांनी, संस्था, संघटनांनी केलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असतानाही २०० आमदारांच्या सह्यांचे पत्र देऊन राज्य सरकारने केंद्र सरकारकडे यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली होती पण त्याचे काहीच झाले नाही. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक करणे, अण्णाभाऊ साठे महामंडळास भागभांडवल देणे, राज्यातील मातंग समाजाच्या कल्याणकारी योजना मार्गी लावाव्या, त्यासाठी निधीची तरतूद करावी, यासारख्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यांना मान्यता देऊन तसेच भारतरत्न पुरस्कार देऊन या महापुरुषाचा यथोचित सन्मान केला पाहिजे पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
मास्कोमध्ये अण्णाभाऊंचा सन्मान झाला याचा आनंदच आहे पण महाराष्ट्र सरकार अण्णाभाऊंच्या कार्याची दखल कधी घेणार हा प्रश्न आहेच. फक्त जयंती व पुण्यतिथीला मोठी-मोठी आश्वासने दिली जातात पण पुढे ही आश्वासनेच राहतात. अण्णाभाऊंचे विचार समाजाला प्रेरणा देणारे आहेत तो विचार तरुण पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करून अण्णाभाऊंचा सन्मान करावा हीच समाजाची अपेक्षा आहे, असेही राजहंस म्हणाले.