एसएमएस-प्रतिनिधी-वैशाली महाडिक.
मुंबई : पक्षाच्या शिस्तीचा भंग करत वरिष्ठ पक्ष पदाधिकाऱ्यांविरोधात सार्वजनिकपणे विधाने केल्याप्रकरणी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार भाई जगताप यांना भोवलं.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी विधाने खुले मंच व माध्यमांमध्ये केल्याची गंभीर दखल पक्षाने घेतली आहे.
पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, भाई जगताप यांनी केलेली विधाने सार्वजनिक डोमेनमध्ये आली असून ती इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली आहेत. ही कृती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापित नियमावली, संघटनात्मक शिस्त आणि नैतिक चौकटीचे उल्लंघन करणारी आहे. नेतृत्व, संघटनात्मक कामकाज अथवा अंतर्गत मतभेद यासंबंधी बाबी पक्षाच्या अंतर्गत मंचांवरच मांडल्या पाहिजेत, सार्वजनिक किंवा माध्यमांच्या व्यासपीठांवर नव्हे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अशा प्रकारच्या वर्तनामुळे पक्षाच्या सामूहिक नेतृत्वाला बाधा पोहोचते, पक्षाची प्रतिमा मलिन होते आणि संघटनात्मक एकतेला धक्का बसतो. विशेषतः सध्याच्या काळात, जेव्हा पक्षाची एकजूट अत्यंत आवश्यक आहे, अशा वेळी या प्रकारची विधाने अनुचित असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेनुसार भाई जगताप यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई का सुरू करू नये, याबाबत सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिकपणे विधाने करण्यामागील कारणे व त्यामागील समर्थन असल्यास ते स्पष्टपणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. विहित मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ही नोटीस महाराष्ट्र प्रभारी सरचिटणीस रमेश चेन्निथला यांच्या वतीने, पक्षाची शिस्त, एकता व प्रतिष्ठा कायम राखण्याच्या उद्देशाने जारी करण्यात आली असून, एआयसीसी सचिव (मुंबई व कोकण विभाग प्रभारी) यू. बी. व्यंकटेश यांनी यावर स्वाक्षरी केली आहे.
खुप विचित्र गोष्ट आहे शब्द जपुन वापरले पाहिजे