मातंग समाजाच्या मागण्यांकडे भाजपा सरकारकडून दुर्लक्ष – सुरेशचंद्र राजहंस..
प्रतिनिधी :मिलन शहा
आरक्षणाचा फायदा सर्व जातींना समान व्हावा यासाठी आरक्षणाचे अबकड वर्गिकरण करावे अशी मागणी मातंग समाज सातत्याने करत आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आरक्षण वर्गिकरणासाठी संजय ताकतोडे पाठोपाठ चिखली, बुलढाणा येथील अंकुश समाधान खंदारे या २५ वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंकुश खंदारेवर आत्महत्या करण्याची वेळ सरकारमुळेच आली, सरकारने याची दखल घेऊन अंकुश खंदारे यांच्या कुटुंबाला तातडीने 10 लाखाची मदत द्यावी व आरक्षण वर्गिकरणावर निर्णय घ्यावा, अशी मागणी मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील अंकुश समाधान खंदारे 25 वर्षाच्या मातंग समाजाच्या तरुणाने अ ब क ड आरक्षणाचे वर्गीकरण करावे. बार्टीच्या धर्तीवर आर्टी स्थापन करण्यात यावी या मागण्यासाठी गळफास घेऊन जीवन संपवले, त्याच्या खिशात सुसाईड नोटही मिळाली आहे. अंकुश समाधान खंदारे हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता तसेच तो सुशिक्षित बेरोजगार होता. मातंग समाजाच्या अ ब क ड आरक्षणासाठी सरकारच्या टोलवाटोलवीने निराश होऊन त्याने टोकाचे पाऊल उचलले. मातंग समाजातील तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, समाजाच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी सरकारला जाब विचारू. संजय ताकतोडे व अंकुश खंदारे या मातंग समाजाच्या तरुणाचे बलिदान वाया जावू दिले जाणार नाही.
आरक्षण प्रश्नी भाजपा सरकार काही समाजाच्यासमोर नरमाईची भूमिका घेत त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करत आहे परंतु मातंग समाजाच्या मागण्यांकडे दुरल्क्ष करत आहे. आरक्षण वर्गिकरणासाठी भाजपा सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मार्च महिन्यात यासंदर्भात बैठक झाली, त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांच्यासोबतही बैठक झाली. सरकारने आरक्षण वर्गिकरणासाठी कर्नाटक व पंजाब राज्याचा अभ्यास दौराही आयोजित केला होता पण कसलाही ठोस निर्णय झालेला नाही, सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे, असेही राजहंस म्हणाले.