
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : नॅशनल लायब्ररी वांद्रे यांच्या वतीने बालदिनानिमित्त आयोजित बालमहोत्सवात साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांच्या ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’, ‘अखेर सापडली वाट’, ‘घरभर दरवळणारा सुगंध’ आणि ‘ज्ञानरंजक काव्यकोडी’ या पुस्तकांचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ज्येष्ठ अभिनेत्री व लेखिका मीना नाईक यांच्या हस्ते तसेच ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.
या वेळी आपल्या मनोगतात मीना नाईक म्हणाल्या, “एकनाथ आव्हाड यांच्या कथा म्हणजे मुलांच्या मनाला स्पर्श करणारी आनंदाची बाग. या कथा मुलांना वाचनानंद देतातच, पण त्यांच्या विचारांना योग्य दिशा देण्याचे कामही करतात.”
समारंभात सुप्रसिद्ध लेखिका ज्योती कपिले आणि कोमसाप मुंबई जिल्हाध्यक्षा विद्या प्रभु यांनी आव्हाड यांच्या पुस्तकांचा परिचय करून दिला. ज्येष्ठ संगीतकार दीपक पाटेकर यांनी संगीतबद्ध केलेली आव्हाडांची काव्यकोडी मुलांनी मनमुराद एन्जॉय केली. बीपीई हायस्कूलचे अध्यक्ष हरीष सुर्वे आणि अनुयोग विद्यालयाचे संस्थापक सतीश चिंदरकर यांचीही भाषणे झाली.
बालमहोत्सवानिमित्त रांगोळी, चित्रकला, नृत्य, किल्ले बनविणे अशा विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीदेखील देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना आव्हाड यांच्या चारही पुस्तकांचा विशेष भेट म्हणून लाभ झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे कार्यवाह विद्याधर झरापकर यांनी केले, तर अध्यक्षीय समारोप कार्याध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी केला. ग्रंथालयाचे कोषाध्यक्ष सुनील धोत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. निवेदन लेखक प्रवीण साळवी यांनी कुशलतेने पार पाडले.
बालदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रंथालयाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुंदर स्तुत्य
Very good