
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : मालाड (पूर्व) मंगेश विश्वस्त मंडळ संचलित मंगेश विद्या मंदिर येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण यांचा समन्वय साधत उत्साहात सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत साकारलेल्या वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडीने झाली. टाळ, मृदंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल-नामाचा’ जयघोष करत शाळेच्या परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशीचे रोपे व ग्रंथ ठेवत पर्यावरण आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीपर गाण्यांवर सुरेख नृत्य सादर केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
या उपक्रमामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव, आणि वाचनाची गोडी निर्माण करणे हा होता, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी मोलाचे सहकार्य केले.