
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. सर्व समाजाचे प्रतिनिधित्व पक्ष संघटना व विविध पदांमध्ये दिसत आले आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षित मतदार संघासाठी उमेदवार निवडत असताना मातंग व तत्सम समाजातील प्रतिनिधींना लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळावी, अशी मागणी मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक प्रदेशाध्यक्ष माननीय श्री नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालय टिळक भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. चर्चेत सहभाग घेत सुरेशचंद्र राजहंस यांनी, अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मतदार संघांसाठी उमेदवार निवड करत असताना राज्यात अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येने क्रमांक दोनवर असलेल्या मातंग समाज व इतर उपेक्षित वंचित जातींच्या प्रतिनिधींना लोकसंख्येच्या प्रमाणात संधी देऊन या समाजाला न्याय द्यावा अशी आग्रही मागणी राज्याच्या नेतृत्वाकडे केली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे तसेच राहुलजी गांधी यांनीही, ज्यांची जेवढी संख्या, तेवढा हिस्सा, अशी भूमिका मांडलेली आहे. काँग्रेस पक्षाच्या जयपूर शिबिरातही समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी देण्यावर भर देण्यात आलेला आहे. जयपूर शिबिरातील निर्णयाची अंमलबजावणी सर्वच स्तरावरील प्रतिनिधित्व देताना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रांताध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राजहंस यांनी सांगितले.