ऋषिराज दुखंडे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे.

मुंबई :मालाड येथील कुरारगाव शिक्षक प्रसारक मंडळ संचालित जिजामाता विद्यामंदिर शाळेतील शिक्षक ऋषिराज रामचंद्र दुखंडे यांची ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, पाचगणी (जि. सातारा) यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या “आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५” साठी निवड करण्यात आली आहे.

शिक्षण क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक उपक्रमांमध्ये दाखवलेली नाविन्यता तसेच समाजातील प्रभावी योगदान याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे.

हा राज्यस्तरीय पुरस्कार समारंभ दिनांक २९ मार्च २०२६ रोजी पुणे येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी (पिंपरी-चिंचवड) येथे आयोजित “ध्येय एज्युकेशन आयकॉन समिट २०२५” मध्ये प्रदान करण्यात येणार आहे.

ऋषिराज दुखंडे हे तंत्रस्नेही शिक्षक असून त्यांनी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर विविध प्रशिक्षणांमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात तज्ञ मार्गदर्शक म्हणून तसेच ‘निपुण महाराष्ट्र’ मोहिमेत बाह्य परीक्षक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्यांची २०२६ साठी “आयडॉल शिक्षक” म्हणूनही निवड झाली असून, शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण करून पीएचडीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सामाजिक उपक्रमांमध्येही ते नेहमी सक्रिय सहभाग नोंदवतात. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


Share

2 thoughts on “ऋषिराज दुखंडे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *