प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबईच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडणारा, वाहतूक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल काही मिनिटांतच वाहतुकीसाठी बंद होणार आहे. शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचा भाग असलेल्या या पूलाचे दुहेरी स्तरावर (डबल डेकर) उन्नतीकरण होणे आवश्यकच आहे, याबाबत शंका नाही. मात्र, एमएमआरडीएने पूल पाडणे आणि नवीन पूल उभारणीचे काम नीट व काटेकोरपणे नियोजित केले आहे, अशी आशा आहे. त्याचबरोबर, रेल्वे प्रशासन आणि पोलीस यांच्याशी उत्तम समन्वय साधून हे काम वेळेत पूर्ण व्हावे, ही अपेक्षा आहे.
सायन पूल बंद झाल्यानंतर आठ महिने उलटूनही, जुन्या पुलाचे पाडकाम अद्याप प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. शासनाच्या या गैरनियोजनाचा आणि यंत्रणांतील समन्वयाच्या अभावाचा फटका सामान्य मुंबईकरांना बसत आहे.
सायन पूल आधीच बंद असताना, टिळक ब्रिज व इतर काही मार्गांवरही रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर पूर्व-पश्चिम वाहतुकीवर गंभीर परिणाम होणार, हे निश्चित आहे.
या कालावधीत प्रवाशांसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग स्पष्टपणे दर्शवणारे फलक मोठ्या प्रमाणात लावावेत. प्रवाशांचे व्यवस्थापन व मार्गदर्शन करण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेस व सुविधांना प्राधान्य दिले जावे. :–खासदार वर्षाताई गायकवाड.