
एसएमएस-प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई, : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) मुंबईच्या वतीने आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय, टिळक भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ दरम्यान कथितरीत्या केलेल्या कृतीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी दिली.
हे आंदोलन भाजयुमो मुंबईचे महामंत्री दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाने संबंधित प्रकाराबाबत स्पष्टीकरण द्यावे व माफी मागावी, अशी मागणी केली.
भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तथा नगरसेवक तेजिंदर सिंह तिवाना यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत अशा प्रकारे घोषणाबाजी करून कार्यक्रमात अडथळा निर्माण करणे निंदनीय आहे. “देश AI क्षेत्रात पुढे जात असताना अशा घटना भारताच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या आहेत,” असे ते म्हणाले.
भाजयुमो पदाधिकाऱ्यांच्या मते, परिषदेदरम्यान काही कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासंदर्भात घोषणाबाजी केली. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
भाजयुमो कार्यकर्त्यांनी देशाच्या प्रगतीस अडथळा आणणाऱ्या कोणत्याही कृतीचा तीव्र निषेध करत भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी भूमिका मांडली.