
प्रतिनिधी:मिलन शाह
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत सामाजिक दायित्व (CSR) च्या माध्यमातून कुलाबा स्थित कूपरेज बँडस्टँड उद्यान येथे मोफत वाचनालय सुरु करण्यात आले असून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते आज (दिनांक २ मे २०२२) त्याचे उद्घाटन करण्यात आले. उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उद्यान अधीक्षक जितेंद्र पदरेशी यांनी माहिती दिली की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत विविध उद्यानांमध्ये सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. ‘Morning Raga’, ‘NCPA@ThePark’ यांसारखे विविध सांगितिक कार्यक्रम आणि इतर सुखद उपक्रम राबवून मुंबईकरांचे धावपळीचे जीवन आल्हाददायी करण्याचा प्रयत्न उद्यान विभागाकडून नेहमीच होत राहिलेला आहे.
याच धर्तीवर बोलताना विविध उद्यानांमध्ये सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून मोफत वाचनालयाच्या संकल्पनेची सुरूवात कूपरेज उद्यानापासून केली गेली आहे. सोशल मीडिया आणि मोबाईलच्या दुनियेत हरविलेल्या नव्या पिढीला वाचनामध्ये रस निर्माण करून एक समृद्ध समाज निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे. या वाचनालयांमध्ये निसर्गविषयक, विविध महापुरूषांच्या जीवन चरित्रविषयक, इतिहासविषयक, वृक्ष-फुले-फळांविषयक, आरोग्यविषयक, चांगल्या जीवन शैलीविषयक त्याचप्रमाणे लहानग्यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने विविध बोधपर गोष्टी तसेच खेळ आणि व्यायामाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून त्या संदर्भातील पुस्तकेही या वाचनालयांमध्ये वाचनास उपलब्ध करून देण्यात आली आहेत.