कोळीवाडे व गावठाणांना झोपडपट्टी घोषीत करून मुंबईच्या भूमिपुत्रांवर अन्याय – वर्षा गायकवाड

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

मुंबईतील सर्व गावठाणे आणि कोळीवाड्यांचे तातडीने मॅपिंग करा !

नवी दिल्ली, दि. 25 मार्च
मुंबईतील गावठाणे आणि कोळीवाडे हे मुंबईच्या अस्तित्वाचे आणि सांस्कृतिक वारशाचे अविभाज्य भाग आहेत.मात्र, मुंबईचा तुकड्या-तुकड्याने लिलाव करण्याच्या कटात गुंतलेल्या या सरकारने भूमिपुत्रांवर घाला घातला आहे. गावठाणे आणि कोळीवाडे हे स्लम नाहीत असा स्पष्ट शासन निर्णय (GR) असूनही, त्यांना स्लम घोषित करून भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणण्याचे आणि या भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. मुंबईच्या भूमिपुत्रांना झोपडपट्टीवासी कसे म्हणता येईल? कोळीवाडे व गावठाणे यांना झोपडपट्टी घोषीत करणे तात्काळ रद्द करावे आणि मुंबईतील सर्व कोळीवाडे व गावठाणे यांचे सीमांकन व मॅपिंग करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली आहे.

लोकसभेत शून्य प्रहरात मुंबईतील कोळीवाडे व गावठाणांचा मुद्दा खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला, त्या पुढे म्हणाल्या की, कोळी व आग्री बांधव हे मुंबईचे आद्य नागरिक आहेत, जवळपास ४०० वर्षे ते मुंबईत स्थायिक आहेत, त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे, त्यांची घरे तेथे आहेत. या पारंपरिक असलेल्या वस्तीला शहरी नियोजनात शहरी गाव म्हणतात. मुंबईत १८९ गावठाणे व ३६ कोळीवाडे आहेत पण मुंबईच्या विकास आराखड्यात केवळ ५२ गावठाणे व २२ कोळीवाडे यांचा समावेश करण्यात आला आहे. हे अन्यायकारक असून भूमिपुत्रांना व आद्य नागरिकांना त्यांचे पारंपरिक हक्क मिळाले पाहिजेत. गावठाणे आणि कोळीवाड्यांची ऐतिहासिक ओळख कायम ठेवत नियोजित पुनर्विकासासाठी तातडीने धोरण जाहीर करावे व त्यात कोळीवाडे व गावठाणांचा समावेश करावा म्हणजे त्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल असे खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.


Share

One thought on “कोळीवाडे व गावठाणांना झोपडपट्टी घोषीत करून मुंबईच्या भूमिपुत्रांवर अन्याय – वर्षा गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *