
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
मुंबई : कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने दिनांक २४ फेब्रुवारी रोजी चेंबूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्वीज व्हिज’ जिल्हास्तरीय स्पर्धेत निवारा विद्यालय, गोरेगाव पूर्व या मराठी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
कुमारी अविशा सुरेंद्र आंब्रे आणि कुमार वल्लभ वैभव शिंत्रे या दोन्ही विद्यार्थ्यांनी तब्बल ३३ शाळांमधून प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा नावलौकिक उंचावला. त्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
निवारा विद्यालयाची स्थापना १९९९ साली नागरी निवारा परिषदेच्या रहिवाशांसाठी ज्येष्ठ समाजसेविका मृणाल ताई गोरे आणि बाबुराव सामंत यांनी केली. दीड वर्षांपूर्वी शाळेचा रौप्यमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला होता. राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित झालेल्या श्रीमती विजया आजबे या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. सध्या समीक्षा साळस्कर या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
शाळेत सध्या सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेत असून बहुसंख्य विद्यार्थी निम्न आर्थिक स्तरातील कुटुंबांमधून आलेले आहेत. तरीही शाळेतील विद्यार्थी आंतरशालेय बौद्धिक, वक्तृत्व आणि विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवत आपले प्राविण्य सिद्ध करत आहेत. ओलिंपियाड स्पर्धा, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रमांसोबतच भरतनाट्यम, गायन अशा कलाक्षेत्रात तसेच खो-खो, कबड्डी सारख्या मैदानी खेळांमध्येही विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
भव्य मैदान, दर्जेदार शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे निवारा विद्यालयाने शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
— श्याम नार्वेकर
विश्वस्त, निवारा विद्यालय, गोरेगाव पूर्व
खुप सुन्दर यात मुलाची आणि शिक्षकाचा मोलाचा वाटा आहे सर्वाचे अभिनंदन
Congratulations
अभिनंदन