एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एसपी) पुरस्कृत नवक्षितिज प्रतिष्ठान यांच्या वतीने गेली २५ वर्षे साजरी करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आला. हा सोहळा कुरार गाव, मालाड पूर्व येथील वीर सावरकर मैदान येथे पार पडला.
या उत्सवाचे आयोजन नगरसेवक अजित रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. त्यांच्या पुढाकारातून गेली पावशतक हा जयंती उत्सव सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने साजरा केला जात आहे.
उद्घाटन प्रसंगी शिवप्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्थानिक नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात शिवचरित्रावर आधारित व्याख्यान, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांच्या वतीने शिवरायांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकात्मता दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
उत्सवाच्या पुढील दिवसांत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.