
एसएमएस-प्रतिनिधी -सोमा बाबू डे.
मुंबई :मालाड पश्चिमेतील मालवणी आंबोजवाडी, येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रजापती महिला मंडळ आणि भीमराज मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिवजयंती कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समितीचे अध्यक्ष श्याम झळके, बाळा आखाडे, दत्तू भवर, अंबादास अंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात शिवछत्रपतींच्या राज्यकारभारातील समता, सुरक्षा, न्यायव्यवस्था आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांचा ऊहापोह केला. शिवाजी महाराजांनी बहुजन समाजासाठी केलेला त्याग, त्यांची दूरदृष्टी आणि अचूक प्रशासन यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे, परिसरातील मुस्लिम बांधवांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले.
शिवजयंतीनिमित्त परिसरात एकोपा, बंधुता आणि सामाजिक सलोखा यांचे प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
जय शिवराय!!